गावभेटींनी तापला राजकीय आखाडा
By Admin | Updated: February 17, 2017 04:41 IST2017-02-17T04:41:38+5:302017-02-17T04:41:38+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे सध्या सर्वत्र सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या गावभेटी सुरू झाल्यामुळे गावागावांत

गावभेटींनी तापला राजकीय आखाडा
कुरकुंभ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे सध्या सर्वत्र सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या गावभेटी सुरू झाल्यामुळे गावागावांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, अगदी खेड्यापाड्यांतून वाहनांवर भोंगे लावून, विविध गाण्यांद्वारे तसेच विविध प्रकारच्या चारोळ्यांच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडत आहे. गावातील प्रत्येक चौकात भोंगा लावलेल्या गाड्या उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत.
कुरकुंभ (ता. दौंड) येथे राष्ट्रवादी व रासपच्या उमेदवारांनी गावभेटीचे नियोजन केल्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार अगदी काही मिनिटांच्या फरकाने प्रत्येक घरात जाताना दिसत आहेत. त्यातच गुरुवार असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आठवडेबाजारामुळे सुटीवर असतात; त्यामुळे स्थानिक नेत्यांनी गुरुवारी गावभेट घेण्याचे नियोजन केले होते.
कुरकुंभ येथील समस्या सोडविण्याचा निर्धार कुठल्याच पक्षाच्या प्रचार दौऱ्यात दिसला नाही. कुरकुंभ येथे गेल्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे भयंकर संकट निर्माण झाले होते; मात्र त्यावर कुठलाच पर्याय ग्रामपंचायत, पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून केला गेला नाही. एकीकडे रासायनिक प्रदूषणामुळे दूषित झालेले पाणी व दुसरीकडे पाण्याच्या बाबतीत नियोजनाचा अभाव त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला होता. याही वर्षी परिस्थितीत काहीच बदल झाला नाही.