उद्यानांची आता ऑनलाइन तिकीटविक्री
By Admin | Updated: November 28, 2014 00:54 IST2014-11-28T00:54:41+5:302014-11-28T00:54:41+5:30
महापालिकेच्या उद्यानांना भेट देणा:या बाहेरगावातील पर्यटकांसाठी तसेच परदेशी पर्यटकांसाठी पालिकेकडून ऑनलाइन तिकीटविक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उद्यानांची आता ऑनलाइन तिकीटविक्री
पुणो : महापालिकेच्या उद्यानांना भेट देणा:या बाहेरगावातील पर्यटकांसाठी तसेच परदेशी पर्यटकांसाठी पालिकेकडून ऑनलाइन तिकीटविक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली दर वर्षी सर्वाधिक पर्यटक भेट देणा:या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांत ती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. महापालिकेतील ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उद्यानांचे शहर असलेल्या बेंगळुरू शहरापाठोपाठ पुण्यात सर्वाधिक उद्याने आहेत. विशेषत: गेल्या दशकभरात शहरांमध्ये उभारण्यात येत असलेली थीम पार्क पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्रबिंदू ठरत आहेत. त्यात कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात, वसंतराव बागुल उद्यान येथील म्युङिाकल फाऊंटन, पु. ल. देशपांडे उद्यानातील मुघल गार्डन आणि जपानी शैलीचे उद्यान, संभाजी उद्यानातील मत्स्यालय, पेशवे उद्यानातील फुलराणी आणि साहसी खेळ उद्यान या उद्यानांना वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते, राज्यभरातून या उद्यानांना भेटी देण्यासाठी हे पर्यटक येतात. मात्र, एकदम मोठय़ा प्रमाणात पर्यटक आल्यास त्यांना तिकिटासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे या पर्यटकांचा वेळ रांगेत जाऊ नये यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्य़ात येणार आहे. (प्रतिनिधी)
प्रायोगिक प्रकल्प राजीव गांधी उद्यानात
ही ऑनलाइन तिकीट प्रणाली सर्वप्रथम कात्रज येथील प्राणिसंग्रहालयाच्या बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संग्रहालयास दर वर्षी अडीच ते तीन लाख पर्यटक भेट देतात. त्यात प्रामुख्याने परदेशी पर्यटकांसह बाहेरगावांवरून शालेय सहलींसाठी येणा:या मुलांचा समावेश मोठय़ा प्रमाणात आहे. ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्यास या सहलींचे नियोजन करताना, पुण्यात आल्यावर पर्यटकांना तसेच मुलांना तिकिटासाठी थांबावे लागणार नाही. तसेच संग्रहालय पाहण्यासाठी जास्त वेळ देता येणार आहे. या प्रायोगिक प्रकल्पानंतर जादा तिकीट असलेल्या सर्व उद्यानांसाठी ही प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.