मिळाली मायेची ऊब अन् नवी ओळख!
By Admin | Updated: January 14, 2017 02:41 IST2017-01-14T02:41:29+5:302017-01-14T02:41:29+5:30
रानपाखरं बनून रानावनात भटकणारी लहान व लडिवाळ बाळं, कधी शाळेच्या मळक्या ड्रेसमध्ये तर कधी उसवलेल्या कपड्यांमध्ये

मिळाली मायेची ऊब अन् नवी ओळख!
लोणावळा : रानपाखरं बनून रानावनात भटकणारी लहान व लडिवाळ बाळं, कधी शाळेच्या मळक्या ड्रेसमध्ये तर कधी उसवलेल्या कपड्यांमध्ये कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता जीवन जगणारी मावळ तालुक्यातील ठाकरवाड्या व आदिवासी वस्तीवरील मुले एकीकडे, तर दुसरीकडे शहरी भागातील मुलांना कपाटे कमी पडतात. ही सामाजिक दरी ओळखत योजक या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आदिवासी पाड्यांमध्ये तब्बल ४०० मुलांना स्वेटर, टी शर्ट, जीन्स, जर्किन, फ्रॉकचे वाटप करत मायेची ऊब अन् नवी ओळखही दिली आहे.
निगडी येथील योजक या संस्थेने मावळातील आदिवासी पाड्यामधील ही परिस्थिती पाहिली व याबाबत काही तरी काम करण्याची जिज्ञासा मनाशी बांधली. याकामी त्यांना साथ मिळाली ती निगडीतील सिटी प्राइड शाळेची. शाळेच्या मुलांनी त्यांची सुस्थितीमध्ये असलेली व कमी वापरलेले कपडे धुऊन, इस्त्री करुन आणून दिले. यातून खऱ्या अर्थाने शहरातील व ठाकरवाडी पाड्यातील मुले यांची मने इंटरनेटशिवाय मायेने जुळली गेली.
योजक संस्थेने पांगळोली, वाकसई, वनाठी, फणसराई, करंडोली या मावळातील वस्त्या, तसेच मूळगाव व भिलवले (खालापूर), ठाकूरवाडी, जांबरुंग व ताडवाडी या कर्जत तालुक्यातील वस्त्यांमध्ये जाऊन ५ ते १२ वयोगटातील मुलामुलींना मायेची ऊब देणारे कपडे वाटले.
संस्थेचे संस्थापक अतुल इनामदार, दामा होले, पांडू होले, अशोक मेंगाळ, रामदास सांबरे, गोविंद पादीर, जानू मुकणे, अशोक जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी नवीन कपड्यांत शाळेमध्ये आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद संस्मरणीय होता, अशी भावना इनामदार यांनी व्यक्त केली. शहरी भागातील मुलांना लहानपणापासून आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, ही भावना जागृत
व्हावी याकरिता योजक संस्थेच्या माध्यमातून दर वर्षी या उपक्रमात सहभागी होण्याचा विश्वास सिटी प्राइड शाळेच्या संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी यांनी व्यक्त
केला. (वार्ताहर)