व्यसनांची सोडा साथ कॅन्सरवर करा मात

By Admin | Updated: February 2, 2015 23:24 IST2015-02-02T23:24:18+5:302015-02-02T23:24:18+5:30

कॅन्सर! असे नुसते म्हटले तरी धडकी भरते. पण, प्रत्यक्ष परिस्थिती उद्भवल्यावर त्याचा सामना करण्याशिवाय पर्याय नसतो.

Get rid of addiction on cancer with cancer | व्यसनांची सोडा साथ कॅन्सरवर करा मात

व्यसनांची सोडा साथ कॅन्सरवर करा मात

कॅन्सर! असे नुसते म्हटले तरी धडकी भरते. पण, प्रत्यक्ष परिस्थिती उद्भवल्यावर त्याचा सामना करण्याशिवाय पर्याय नसतो. या आजाराची पूर्ण माहिती आणि उपचार घेत असतानाच मानसिक अवस्था जपणेही तितकेच महत्त्वाचे असते. उद्या ४ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या जागतिक कॅन्सर दिनानिमित्त...

न्सर हा एकच आजार नसून, त्याचे शेकडो प्रकार आहेत. पण सर्वच कॅन्सरच्या गाठींची सुरुवात एका पेशीपासूनच होते. शरीराचा प्रत्येक अवयव पेशींपासून बनलेला असतो आणि त्यांची वाढ नियंत्रितरीतीने होत असते. कधीकधी काही कारणांनी हे नियंत्रण सुटते आणि या पेशी अनिर्बंधपणे, बेशिस्तपणे वाढू लागतात. आणि इथेच कॅन्सरची सुरुवात होते. या अनिर्बंध वाढलेल्या पेशी इतरत्र पसरू लागतात आणि तेथील अवयवांच्या कार्यात बाधा आणतात. कॅन्सर होण्याचे निश्चित असे कारण सांगता येणे अवघड आहे.
व्यसनाधीनता हे कॅन्सरचे सगळ्यात महत्त्वाचे आणि टाळता येण्यासारखे कारण आहे. वाढते वयदेखील कॅन्सरचे महत्त्वाचे कारण आहे. अनुवंशिकता, बदलती जीवनशैली, स्थूलपणा, हॉर्मोन्सचे वाढते असंतुलन, काही विषारी रसायने, प्रदूषण ही कॅन्सरची आणखी काही महत्त्वाची कारणे आहेत. कॅन्सरच्या निदानासाठी त्या गाठीचा तुकडा किंवा सुईद्वारे गाठीतील रक्त काढून तपासले जाते, यावरून कॅन्सरचा नेमका प्रकार कोणता, हे तपासले जाते. याशिवाय एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पेटस्कॅन यांसारख्या तपासण्यांद्वारे कॅन्सरची व्याप्ती समजू शकते. कॅन्सरवरील उपचार ठरविण्यासाठी आजाराची व्याप्ती माहीत असणे गरजेचे असते. एकाच जागी असलेल्या आजाराला शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकता येते किंवा तिच्यावर रेडीओथेरपीद्वारे क्ष-किरणांचा मारा करता येतो. सर्वत्र पसरलेल्या आजाराला किमोथेरपीचे उपचार करावे लागतात. कॅन्सरच्या निदानाने घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. आज सर्व प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी असे उपचार उपलब्ध आहेत. अशा वेळी कुटुंबातील इतर लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरतो. रुग्णाला धीर देऊन त्याचे मनोधैर्य वाढविल्यास रुग्ण उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देतो. औषधांबरोबरच उत्तम आहार आणि जमेल तसा व्यायाम गरजेचा आहे.
कॅन्सरचे उपचार दीर्घकाळ चालणारे असतात. त्यामुळे रुग्ण कधी कंटाळतात तर कधी खचून जातात. अशा वेळी कुटुंबीय किंवा मित्र-मंडळींनी आधार दिल्यास रुग्ण उपचार पूर्ण करूशकतो आणि कॅन्सरवर मात करण्यात यशस्वी होतो. उपचार अर्धवट सोडून देणे, उपचारात दिरंगाई करणे किंवा अयोग्य पद्धतीने उपचार करून घेणे प्रकृतीला अपायकारक ठरू शकते. त्यामुळे या रोगाशी सामना करावा लागू नये यासाठी प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये व्यसनांपासून दूर राहणे, भाज्या व फळेयुक्त समतोल आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि वेळोवेळी शरीराच्या तपासण्या करून घेणे गरजेचे आहे.
सर्व सुरळीतपणे सुरू असतानाही कॅन्सरच्या स्क्रीनिंग टेस्ट केल्या जातात. ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयमुखाचा कॅन्सर, मोठ्या आतड्याचा कॅन्सर आणि प्रोटेस्ट ग्रंथींचा कॅन्सर यामध्ये चाचण्या वेळीच होणे गरजेचे आहे. लवकर निदान झाल्याने प्राथमिक अवस्थेतच उपचार होतात आणि रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कॅन्सरच्या तपासण्यांबाबत दक्ष राहावे.
लेखक कर्करोगतज्ज्ञ (डी.एम.) आहेत.

डॉ. चेतन देशमुख

Web Title: Get rid of addiction on cancer with cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.