बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी
By Admin | Updated: January 28, 2017 00:05 IST2017-01-28T00:05:26+5:302017-01-28T00:05:26+5:30
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी वटहुकूम काढण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा,

बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी
मंचर : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी वटहुकूम काढण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रांदरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पुणे जिल्ह्यातही दिवाळीनंतर मे महिन्यापर्यंतच्या काळात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. गावोगावी होणाऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यती पाहताना अथवा त्यात सहभाग घेताना शेतकरी आपली सारी दु:खे विसरून आनंद घेत असतो. काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने बैल या प्राण्याचा अधिसूचित प्राण्यांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतींवर बंदी लादली गेली आहे. या बंदीविरोधात शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली असून, सर्वोच्च न्यायालयातही शेतकऱ्यांच्या वतीने बैलगाडा मालकांच्या संघटना व मी स्वत: लढा देत आहे.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी केवळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असून, त्यासाठी केंद्र सरकारने वटहुकूम काढून बैल हा प्राणी पर्यावरण विभागाच्या अधिसूचित यादीतून वगळण्याची गरज आहे. आपण तमिळनाडूच्या धर्तीवर आचारसहिंता संपल्यानंतर वटहुकूम काढण्याचे जाहीर केले असले, तरी त्या वटहुकमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, हे आज तमिळनाडूच्या वटहुकमाला देण्यात आलेल्या न्यायालयातील आव्हान याचिकेमुळे स्पष्ट झाले आहे.