जेफ्री आर्चर एक सुखद अनुभव... त्याच्या चाहत्यांसाठी

By Admin | Updated: March 4, 2015 00:41 IST2015-03-04T00:41:02+5:302015-03-04T00:41:02+5:30

औंधमधील परिहार चौकातील चकचकीत असा परिसर. तेथील क्रॉसवर्ड या पुस्तकांच्या दालनाबाहेर गर्दी जमलेली असते. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत साऱ्या वयोगटातले.

Geoffrey Archer is a pleasant experience ... to his fans | जेफ्री आर्चर एक सुखद अनुभव... त्याच्या चाहत्यांसाठी

जेफ्री आर्चर एक सुखद अनुभव... त्याच्या चाहत्यांसाठी

पुणे : औंधमधील परिहार चौकातील चकचकीत असा परिसर. तेथील क्रॉसवर्ड या पुस्तकांच्या दालनाबाहेर गर्दी जमलेली असते. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत साऱ्या वयोगटातले.
साऱ्यांची एकच धडपड, आपल्याला आत जाता येईल का? ज्याचे संपन्न साहित्य रोज वाचतो आणि उशाशी बाळगतो, त्याला पाहता येईल का? त्याला ऐकता येईल का? त्याच्याशी बोलता येईल का? आणि त्याच्याच पुस्तकावर त्याची स्वाक्षरी घेता येईल का?
अशा या प्रश्नांतून निर्माण होणारी धडपड मंगळवारी सायंकाळी मिनिटा-मिनिटाला जाणवत होती. वाचकांची अफाट संख्या, त्यांचा उत्साह, लेखकराजावरील प्रचंड प्रेम हे सारे एकच दर्शवत होते, लोक वाचतात आणि अफाट वाचतात.
‘तो एक परदेशी लेखक जगमान्य असा... लक्ष्मण-द्रविड या भारतीय खेळाडूंची नजाकत त्याला आवडते. म्हणूनच २०-२० या प्रकारात अर्थ नाही, असे विधान ‘तो’ करतो. क्रिकेटमधील त्याची आवड अगदी त्याच्या अभिजात साहित्याशी मिळतीजुळती. असा तो जगमान्य जेफ्री आर्चर. मुंबई विमानतळावर तो पोहोचतो तर परदेशी असल्यामुळे तेथील एक विक्रेता त्यालाच हटकून म्हणतो, ‘तुम्हाला जेफ्री आॅर्चरचे बेस्ट सेलर पुस्तक हवेय का?’ या अनुभवाने तो अधिकच संपन्न होतो. भारतासारख्या अफाट वाचक असलेल्या देशात यायला मला आवडते, असे तो वाचकांशी बोलताना आवर्जून सांगतो.
‘भारतात अफाट वाचक आहेत आणि अशा देशात मी अव्वल आहे,’ हे त्याचे वाक्य वाचक प्रतिसादातून तंतोतंत सिद्ध करतात. मंगळवारची पुण्यातील सायंकाळ जेफ्री आर्चरच्या वाचकांसाठी अद्भुत असतेच; पण त्याहूनही ती आर्चरसाठी, कारण भारतात आपण अव्वल आहोत, ही खूण त्याला पटलेली असते, उपस्थितांच्या गर्दीवरून आणि उत्साहावरून.
एकदाचा का तो क्षण आला... तो बोलायला लागला. सर्व जण स्वत:ला सिद्ध करतात आणि कान टवकारतात. तो बोलू लागतो, मुंबई विमानतळावरील अनुभव सांगतो. भारतात अव्वल असल्याबद्दल प्रचंड आनंद व्यक्त करतो. टाळ्या पडतात. पुढच्या पुस्तकात मी भारतीय खलनायक रंगावणार आहे. मी माणसांची प्रवृत्ती, स्वभाववैशिष्ट्ये माझ्या पात्रांत पुरेपूर उतरविण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मी माणसांचे कायम निरीक्षण करतो. आजवर कादंबऱ्या लिहिल्या, आता लघुकथा लिहीन. भारतीय निर्मात्याबरोबर काम करण्याची मला इच्छा आहे. अशा त्याच्या एका-एका वाक्याला दाद मिळत जाते. आॅर्चरने नवीन साहित्यनिर्मितीचे जसे संकेत दिलेले असतात तसेच चित्रपटाचेही. काही जण अनुभवसंपन्न होऊन बाहेर पडतात तर काहींची आत जाता येईल का, यासाठीच धडपड सुरू असते. (प्रतिनिधी)

एका तासात सव्वासहा हजार पुस्तकांची विक्री
जेफ्री आॅर्चर क्रॉसवर्डमध्ये आपल्या ‘‘माईटियर दॅन द स्वॉर्ड’’ या पुस्तकाच्या प्रकाशानासाठी आले होते. या समारंभाच्या निमित्ताने आॅर्चर यांची एकूण ६ हजार ३४९ पुस्तके मंगळवारी या दालनात विकली गेली, तर ‘माईटियर दॅन द स्वॉर्ड’ या बेस्टसेलर पुस्तकाची तब्बल ३ हजार ८३९ प्रती इतकी विक्री झाली.

Web Title: Geoffrey Archer is a pleasant experience ... to his fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.