गावरान हापूसने केली ‘राजा’वर कुरघोडी
By Admin | Updated: May 19, 2014 00:28 IST2014-05-19T00:28:20+5:302014-05-19T00:28:20+5:30
गावरान हापूस आंबा रविवारी मुळशी परिसरातून बाजारात दाखल झाला. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात गावरान आंब्याची २२५ डझन एवढी आवक झाली.

गावरान हापूसने केली ‘राजा’वर कुरघोडी
पुणे : गावरान हापूस आंबा रविवारी मुळशी परिसरातून बाजारात दाखल झाला. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात गावरान आंब्याची २२५ डझन एवढी आवक झाली. सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा असल्याने या आंब्याला विशेष मागणी असते. दरम्यान, रत्नागिरी हापूस आंब्याचे भाव उतरले आहेत. मुळशी परिसरातील बेलावडे, उरावडे, मांदेरे, खेचरे आणि मांडवे या भागातून आवक सुरू झाली असून, रविवारी प्रतिडझन १५० ते २०० रुपये भाव मिळाला. या वर्षी तुलनेने आठवडाभर आधीच या आंब्याची आवक सुरू झाली आहे. हा हंगाम जून अखेरपर्यंत चालू राहील, असे व्यापारी यशवंत कोंडे यांनी सांगितले. हा आंबा शेतकरी कॅल्शियम कार्बाईडविना पिकवितात. चवीला गोड आणि सामान्यांना परवडेल, असे असल्याने ग्राहकांची पसंती मिळते. वेल्हा तालुक्यातून वाजेगर या भागातून बाजारात गावरान गोटी आंब्याची सुमारे ६ हजार डझन आवक झाली. दर वर्षीच्या तुलनेत यंदा गोटी आंबा कमी प्रमाणात असून, पुढील १५ दिवसांत ही आवक वाढेल, असे शेतकरी रामभाऊ शिर्के यांनी सांगितले.