इंद्रायणीकाठी जमला वैष्णवांचा मेळा

By Admin | Updated: December 7, 2015 00:14 IST2015-12-07T00:14:02+5:302015-12-07T00:14:02+5:30

रविवारपासून संजीवन समाधी सोहळ््याच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात होत असून शनिवारच्या तुलनेत आज आळंदीत भाविकभक्तांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत होती.

The gathering of the Vaishnavas gathering for Indraaniyani | इंद्रायणीकाठी जमला वैष्णवांचा मेळा

इंद्रायणीकाठी जमला वैष्णवांचा मेळा

शेळपिंपळगाव : रविवारपासून संजीवन समाधी सोहळ््याच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात होत असून शनिवारच्या तुलनेत आज आळंदीत भाविकभक्तांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत होती.
रविवारी पहाटे तीनला माऊलींची नित्यानियमांप्रमाणे पवमान, अभिषेक व दूधआरती करून महाराजांची आरती घेण्यात आली. पूजेनंतर सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत भाविकभक्तांच्या महापूजा पार पडल्या. या वेळी दर्शनरांगेतून येणाऱ्या भाविकांना समाधीच्या दर्शनासाठी मुख्य मंदिरात प्रवेश दिला जात होता. दुपारी साडेबारा वाजता देवस्थानच्या वतीने ‘श्री’ना महानैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी चारच्यादरम्यान गुरू हैबतबाबांच्या दिंडीची मंदिर व नगरप्रदक्षिणा पार पडली.
वीणामंडपात हभप गंगूकाका महाराज शिरवळकर यांचा हरिकीर्तनानंतर सलग हभप धोंडोपंत अत्रे यांचे हरिकीर्तन झाले. धूपारतीनंतर रात्री नऊला वीणामंडपात हभप वास्कर महाराज यांचे कीर्तन झाले. त्यानंतर रात्री साडेअकरानंतर वाल्हेकर महाराज यांच्या वतीने जागराचा कार्यक्रम घेऊन रात्री बाराला कार्तिकी एकादशीच्या मुख्य पूजेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. सुरक्षा यंत्रातून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता.
कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीतील सर्वच धर्मशाळा, राहुट्या, फडामध्ये टाळ-मृदंगांचा गजर सुरू असल्याने अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघत असून, भाविक मोठ्या प्रमाणात अलंकापुरीत दाखल होत असल्याने संपूर्ण शहरात वारकऱ्यांचे फड लागले आहेत.
बाजारपेठेत तुळशीच्या माळा, पूजेचे साहित्य, खेळणी आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. मनोरंजनासाठी विविध ठिकाणांहून आळंदीत आलेले खेळ तिकीट घेऊन भाविकांना पाहायला मिळत आहे. संजीवन समाधी सोहळा अगदी काही तासांवर येऊन ठेपला असल्याने भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
एका तासात सुमारे हजाराहून अधिक भाविकांना समाधीस्थळाचे दर्शन दिले जात असल्याने, दर्शनबारीतून आठ तासांत भाविक मुख्य मंदिरात पोहोचत असल्याचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी यांनी सांगितले.
 

Web Title: The gathering of the Vaishnavas gathering for Indraaniyani