गॅसवाहिनीचे काम बंद पाडले
By Admin | Updated: November 7, 2014 00:01 IST2014-11-07T00:01:55+5:302014-11-07T00:01:55+5:30
शासकीय नियमांना तिलांजली देत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांना दमदाटी करून सुरू असणारे गॅसवाहिनीचे काम अखेर बिरदवडी (ता. खेड) येथील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.

गॅसवाहिनीचे काम बंद पाडले
आंबेठाण : शासकीय नियमांना तिलांजली देत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांना दमदाटी करून सुरू असणारे गॅसवाहिनीचे काम अखेर बिरदवडी (ता. खेड) येथील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.
एच.पी.सी.एल. कंपनीचे गॅसवाहिनी टाकण्याचे काम बिरदवडी येथे सुरूआहे.
या ठिकाणी पाईप भूमिगत करण्यासाठी रस्ता खोदाई करताना ती अगदी रस्त्यालगत आणि साईडपट्टी खोदून केली जात आहे. तसेच हे काम करीत असताना आजूबाजूच्या शेतीचे आणि त्यात असणाऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. नुकसानीबाबत विचारल्यास शेतकरी आणि ग्रामस्थांना येथील कर्मचाऱ्यांकडून पिस्तुलाचा धाक दाखविला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच केवळ आश्वासने देऊन आणि नुकसान भरपाई देण्याचे गाजर दाखवून वेळ मारून नेली जात आहे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
नियम धाब्यावर बसविला जात असताना शासकीय अधिकारी गप्प कसे? असा सवालही केला जात आहे. अगोदरच अरुंद असणारा रस्ता खोदला जात असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या ठिकाणावरून धोकादायक गॅस वाहिनी जात असल्याने नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत असून, आपले आरोग्य धोक्यात येते आहे तसेच भविष्यात जीव मुठीत धरून जगावे लागेल, अशी नागरिकांना भीती आहे.
बाबा काझी, दत्तात्रय चौधरी, रमेश गोतारणे, बाळासाहेब मुळे यांच्यासह शेतकरी या वेळी उपस्थित होते.