दागिने नदीपात्रात लपविल्याचे निष्पन्न
By Admin | Updated: July 11, 2015 05:12 IST2015-07-11T05:04:10+5:302015-07-11T05:12:31+5:30
अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गणेशाची आभूषणे चोरल्यानंतर त्यातील काही दागिने चोरट्याने शिवाजी पुलाखालील नदीपात्रामध्ये एका झुडपामध्ये लपवून

दागिने नदीपात्रात लपविल्याचे निष्पन्न
पुणे : अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गणेशाची आभूषणे चोरल्यानंतर त्यातील काही दागिने चोरट्याने शिवाजी पुलाखालील नदीपात्रामध्ये एका झुडपामध्ये लपवून ठेवल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी शुक्रवारी ३६ लाखांचे हे दागिने हस्तगत केले. तानाजी नारायण कुडले (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरुड) असे आरोपीचे नाव आहे. त्याला शिवाजीनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी न्यायालयातील नळ चोरताना पकडले होते. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्याकडे पोलिसांनी सविस्तर तपास केल्यानंतर आरोपीने दागिने शिवाजी पुलाखाली लपवून ठेवल्याचे सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी शिवाजी पुलाखालील नदीपात्रामध्ये असलेल्या झुडपात एका दगडाखाली कुडलेने लपवलेले हे दागिने जप्त केले. त्याच्या वडिलांनी गुरुवारी वीस तोळ्यांचे दोन हार कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये स्वत: जमा केले होते. अजूनही दोन लाख रुपयांचे दागिने हस्तगत करायचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.