पक्ष्यांसाठी घरातच फुलविला बगीचा
By Admin | Updated: February 2, 2015 02:27 IST2015-02-02T02:27:44+5:302015-02-02T02:27:44+5:30
वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या सिमेंटच्या जंगलामध्ये चिमण्यादेखील हरवून गेल्या आहेत. तसेच सतत होणारी वृक्षतोड व अनेक कारणांमुळे

पक्ष्यांसाठी घरातच फुलविला बगीचा
प्रियांका लोंढे , पुणे
वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या सिमेंटच्या जंगलामध्ये चिमण्यादेखील हरवून गेल्या आहेत. तसेच सतत होणारी वृक्षतोड व अनेक कारणांमुळे पक्ष्यांचा अधिवास शहरी भागात रोडावलेला दिसतोय. अशातच नेहा जोशी या विद्यार्थिनीने केवळ पक्षिप्रेमापोटी आपल्या घरातच पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी बाग फुलविली आहे.
कोणत्या झाडावर कोणते पक्षी जास्त प्रमाणात येतात, पक्षी काय खातात, अशा प्रकारचे संशोधन करुन वेगवेगळी झाडे तिने आपल्या घरातील बगीचामध्ये लावली. कुंड्यांमध्ये झाडे लावली तर त्यावर चिमणी किंवा छोट्या पक्ष्यांशिवाय दुसरे पक्षी
येणार नाहीत, हे समजल्यावर नैसर्गिक पद्धतीने झाडांना जंगल इफेक्ट दिला. त्यामुळे सर्व प्रकारचे पक्षी येऊ लागले.
कुंड्यांमध्ये थोडा कचरा झाला तरी आपण तो साफ करतो. परंतु, कचऱ्यामध्ये काही वेळा पक्ष्यांचे अन्न दडलेले असते. पालापाचोळा गोळा करणे व कचऱ्यातील अळ्या खाण्यासाठी पक्षी घरातील झाडांवर येतात. सनबर्ड, बुलबुल, पेंटास या पक्ष्यांसह फुलपाखरे व इतर पक्षी देखील बागेमध्ये येऊ लागले आहेत.
पर्यावरण, निसर्ग, झाडे व पक्ष्यांविषयी लहानपणापासूनच आवड होती. एम.एस.सी.करताना पर्यावरण विषयात अभ्यास केला. पक्ष्यांना निवारा मिळण्यासाठी काय करता येईल, कशा प्रकारे झाडे लावता येतील यावर विचार सुरु केला आणि घरातच झाडांना जंगल इफेक्ट देऊन बाग तयार केल्याचे नेहाने सांगितले. शहरी भागातून हरवलेल्या पक्ष्यांचा अधिवास वाढवायचा असेल तर अशा प्रकारे प्रत्येकाने घरातल्या घरात थोडी झाडे लावली तरी पक्ष्यांचे अस्तित्व टिकण्यास मदत होईल, असेही ती म्हणाली.
(प्रतिनिधी)