गर्भलिंगनिदान करणारे जेरबंद
By Admin | Updated: March 11, 2017 03:32 IST2017-03-11T03:32:41+5:302017-03-11T03:32:41+5:30
बिरोबावाडी (ता. दौंड) येथे फिरत्या पथकाद्वारे गर्भलिंगनिदान चाचणी करणाऱ्यांची टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडली आहे. त्यांच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन

गर्भलिंगनिदान करणारे जेरबंद
यवत : बिरोबावाडी (ता. दौंड) येथे फिरत्या पथकाद्वारे गर्भलिंगनिदान चाचणी करणाऱ्यांची टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडली आहे. त्यांच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, ८ मोबाईल, गर्भपात करण्याचे औषध व आलिशान मारुती सुझुकी सियाज कार पोलिसांनी जप्त केली आहे. या टोळीत रत्नागिरी येथे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या एका डॉक्टरचादेखील समावेश आहे.
डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय ४५, रा. लक्ष्मीनगर, फलटण), त्याचा मदतनीस हेमंत बबन आटोळे (वय ३५, रा. रावणगाव, ता. दौंड), चालक संपत आतारी (वय ४२, रा. फलटण) व सोमथान होले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी डॉ. रूपाली पाखरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड, बारामती, इंदापूर व फलटण परिसरात बेकायदेशीररीत्या गर्भलिंगनिदान चाचणी करीत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस नाईक दशरथ कोळेकर, दीपक पालखे, मीनल शिवरकर, सविता धुमाळ यांनी सापळा रचला. ही कारवाई करण्यासाठी पोलिसांनी डॉ. रूपाली पाखरे, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. के. वाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
- ही टोळी बिरोबाचीवाडी येथे सोपान होले यांच्या घरी ३ महिलांचे गर्भलिंगनिदान करणार असल्याचे समजल्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता, तेथे आरोपी डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे, मदतनीस हेमंत आटोळे, संपत आतारी हे गर्भलिंगनिदान चाचणी करताना रंगेहाथ आढळले. त्यांच्याकडून सोनोग्राफी मशीनसह गाडी, गर्भपात करण्याचे औषध व रोख ५९ हजार २६० रुपये, असा १३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.