महापौरांच्या दिमतीला कचरा ठेकेदाराची गाडी

By Admin | Updated: May 26, 2015 01:14 IST2015-05-26T01:14:27+5:302015-05-26T01:14:27+5:30

पुणे शहराचे महापौर गेल्या साडेतीन वर्षांपासून कचरा ठेकेदाराची मोटार वापरीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

Garbage Contractor's car to the mayor's custody | महापौरांच्या दिमतीला कचरा ठेकेदाराची गाडी

महापौरांच्या दिमतीला कचरा ठेकेदाराची गाडी

पुणे : राज्यातील अ वर्ग महापालिकेचा दर्जा मिळवून मेट्रो सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या पुणे शहराचे महापौर गेल्या साडेतीन वर्षांपासून कचरा ठेकेदाराची मोटार वापरीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. प्रशासनाने त्यांच्या ताब्यात असलेली कचरा ठेकेदाराची मोटार महापौरांना वापरण्यासाठी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी मोटारीबाबत माहिती घेतली असता हा प्रकार उजेडात आला.
महापौर आणि उपमहापौर यांच्या नवीन मोटारी खरेदीसाठी २३ लाख रुपये वर्गीकरणातून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये त्यावर निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी कधी मोटार खरेदी करण्यात आली होती, याची माहिती घेत ही मोटार कचरा ठेकेदाराच्या मालकीची असल्याचे उजेडात आले.
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने हंजर कंपनीबरोबर २०१२ मध्ये करार केला होता. हंजर कंपनीच्या कचरा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी बाहेरून पाहुणे आल्यास त्यांना तिथे घेऊन जाण्यासाठी हंजर कंपनीने महापालिकेला मोटार उपलब्ध करून द्यावी असे या करारामध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानुसार कंपनीने मोटार दिली होती, दरम्यानच्या काळात त्या मोटारीचा अपघात होऊन ती नादुरुस्त झाली. त्या वेळी ठेकेदाराने नवीन टोयाटो आल्टिस ही गाडी खरेदी करून पालिकेला दिली. तत्कालीन महापौर वैशाली बनकर यांची मोटार वारंवार नादुरुस्त होत असल्याने प्रशासनाने त्या वेळी ठेकेदाराची टोयाटो आल्टिस गाडी महापौरांना वापरण्यासाठी दिली. तेव्हा ही मोटार महापौर वापरीत आहेत. वैशाली बनकर यांच्यानंतर सव्वा वर्ष चंचला कोंद्रे यांनी ही गाडी वापरली. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून दत्तात्रय धनकवडे ही मोटार वापरीत आहेत. प्रशासनाकडून महापौरांना ठेकेदाराच्या मालकीची मोटार दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ठेकेदाराकडून महापालिकेला ही मोटार देण्यात आली आहे, मात्र ती महापालिकेच्या नावावर ट्रान्सफर करण्याचे काम राहून गेले असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

उपमहापौरांसाठी वर्षभरात नवीन मोटार?
उपमहापौर आबा बागुल यांच्याकडील टाटा मांझा कंपनीची मोटार एप्रिल २०१४ मध्ये घेण्यात आली असून, त्या मोटारीचे २१ हजार ७२१ किमी रनिंग झाले आहे. एका वर्षातच उपमहापौरांसाठी नवीन मोटार घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याचा भुर्दंड महापालिकेला बसणार आहे.
सतत नादुरुस्त असल्याने नवीन खरेदी
सध्या वापरात असलेली टोयाटो आल्टिस ही मोटार सातत्याने नादुरुस्त होत आहे, त्यामुळे प्रशासनाने नवीन मोटार खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. ही मोटार कधी केली याची आज अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असताना हंजर कंपनीच्या ठेकेदाराकडून ही मोटार महापालिकेकडे आली असल्याची माहिती मिळाली.
-दत्तात्रय धनकवडे, महापौर

Web Title: Garbage Contractor's car to the mayor's custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.