गुंजवणी धरण ५५.१७ टक्के भरले
By Admin | Updated: July 21, 2014 04:04 IST2014-07-21T04:04:13+5:302014-07-21T04:04:13+5:30
वेल्हे तालुक्यात या वर्षी १५ जुलैपर्यंत पाऊस न झाल्याने तालुक्यातील शेतीवर परिणाम झाला असून, भातपिकासह इतर पिकांचे उत्पादनदेखील घटणार आहे.

गुंजवणी धरण ५५.१७ टक्के भरले
मार्गासनी : वेल्हे तालुक्यात या वर्षी १५ जुलैपर्यंत पाऊस न झाल्याने तालुक्यातील शेतीवर परिणाम झाला असून, भातपिकासह इतर पिकांचे उत्पादनदेखील घटणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाने उशीर केला असून, या पावसामुळे भातलावण्या रखडल्या आहेत.
साधारणत: सात जूनला वेल्ह्यात पाऊस पडतो. या वर्षी वेल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाताचे बियाणे पेरले होते. सुरुवातीला पाऊस झाल्याने भातरोपे जोमात आली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने ही भातरोपे जळाली. यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. तालुक्यात मागील वर्षी (२०१३) जुलैअखेर ९० टक्के शेतकऱ्यांनी भातलावणी केली होती. पण या वर्षी मात्र १५ ते २० टक्केच भाताची लावणी झाली आहे.
तालुक्यातील पासली व गुंजवणी धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने गुंजवणी धरण ५५.१७ धरण भरले आहे. तर याच परिसरात सध्या भातलावणी सुरू आहे तर वेल्हे, पाबे, दापोडे, मार्गासनी परिसरात भातरोपे लहान असल्याने तसेच पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाणी शेतात साठले नाही. त्यामुळे या परिसरातील भातलावणी रखडली आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त पाऊस वेल्ह्यात पडतो. पण या वर्षी २० जुलैपर्यंत ५५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. (वार्ताहर)