गोंदियाच्या तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार?
By Admin | Updated: January 2, 2016 08:37 IST2016-01-02T08:37:01+5:302016-01-02T08:37:01+5:30
गोंदिया जिल्ह्यामधून अपहरण करून पुण्यात आणलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी गोंदिया येथे अपहरणाचा गुन्हा दाखल असून

गोंदियाच्या तरुणीवर पुण्यात सामूहिक बलात्कार?
पुणे : गोंदिया जिल्ह्यामधून अपहरण करून पुण्यात आणलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी गोंदिया येथे अपहरणाचा गुन्हा दाखल असून गुरुवारी रात्री या तरुणीने पुणे पोलिसांकडे केलेल्या बलात्काराच्या तक्रारीमुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली.
पीडित मुलगी मूळची गोंदिया येथील राहणारी आहे. १८ डिसेंबर रोजी तिचे गर्ल्स कॉलेजजवळून जात असताना तिच्या मोबाईलवर एक फोन आला होता. त्यामध्ये पीडित मुलीसह तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली, याची माहिती तिने आईला मेसेज करून दिली होती. त्यानंतर तिचा पाठलाग करून तिघा जणांनी अपहरण केले होते. तिला जेव्हा जाग आली तेव्हा ती मुलगी एका खोलीमध्ये बंद होती. त्या खोलीतच तिच्यावर तिघा जणांनी बलात्कार केला. त्यानंतर तिला पुण्याला आणून भारती विद्यापीठ परिसरात ठेवण्यात आले. तेथील एका खोलीमध्ये तिच्यावर पुन्हा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
पीडित मुलीच्या आईने १८ डिसेंबर रोजी गोंदिया पोलिसांकडे अपहरणाची फिर्याद नोंदवली होती. त्यानंतर गोंदिया पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. या मुलीला घेण्यासाठी पोलीस पुण्यात आले होते. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीमध्ये नोंद करून गोंदिया पोलीस तिला घेऊन गेले. आपले अपहरण झाले नव्हते, तर आपण स्वत:च्या संमतीनेच आलो होतो, अशा आशयाचा तिचा जबाब लिहून घेण्यात आला. त्यानंतर या मुलीला पुन्हा पुण्यात पाठवण्यात आले. काही दिवस एका बिहारी महिलेकडे राहिल्यानंतर गुरुवारी रात्री पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानुसार मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवालामधून या मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे गोंदिया पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
माझ्या मुलीचे १८ तारखेला अपहरण झाल्यानंतर तिच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली होती. २४ तारखेला मला गोंदिया पोलिसांनी मुलगी पुण्यात सापडल्याचे कळवले. त्यांनी माझ्या मुलीने लग्न केल्याची माहिती मला दिली. मात्र मुलीने मला तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले. पुण्यामधून मुलीला गोंदियामध्ये आणल्यानंतर माझ्या ताब्यात न देता परत पुण्याला पाठवून दिले. गोंदिया पोलीस स्थानिक राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली काम करीत आहे. त्यांनी हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे पोलिसांनी आमची तक्रार ऐकून घेत तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेतली. तसेच मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे. आम्ही गोंदियाला जाऊन बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहोत.
- पीडित मुलीची आई
पीडित मुलीचा अर्ज प्राप्त होताच तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली आहे. या मुलीचा जबाब आणि वैद्यकीय अहवाल घेऊन एक पोलीस कर्मचारी तसेच पीडित मुलीला गोंदियाला पाठवण्यात आले आहे. त्या ठिकाणी अपहरणाचा गुन्हा दाखल असल्यामुळे त्याच गुन्ह्यात बलात्काराचे कलम समाविष्ट करून घ्यावे, असे गोंदिया पोलिसांना सांगितले आहे. पीडितेला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
- मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त,
स्वारगेट विभाग