केअर टेकर बनून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:15 IST2021-05-05T04:15:56+5:302021-05-05T04:15:56+5:30

चतु:श्रृंगी पोलिसांची कारवाई : ज्येष्ठ दाम्पत्यांना लुटल्याचे गुन्हे उघडकीस लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केअर टेकर बनून घरात येऊन ...

A gang of robbers who became care takers was arrested | केअर टेकर बनून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

केअर टेकर बनून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

चतु:श्रृंगी पोलिसांची कारवाई : ज्येष्ठ दाम्पत्यांना लुटल्याचे गुन्हे उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केअर टेकर बनून घरात येऊन रेकी करून रात्रीच दरोडा टाकत ज्येष्ठ दाम्पत्याला लुटणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांनी औरंगाबाद, जालना, नाशिक, पैठण येथून ताब्यात घेतले. सिंध सोसायटी आणि पंचवटी येथील ज्येष्ठ दाम्पत्यांना लुटणारे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात चतु:श्रृंगी पोलिसांना यश आले.

संदीप भगवान हांडे (वय २५, रा. पिंपळखेडा, औंरगाबाद), मंगेश बंडु गुंडे (वय २०, रा. वडीकाळ्या, जि. जालना), राहुल कैलास बावणे (वय २२, रा. पीर कल्याण, जालना), विक्रम दीपक थापा उर्फ बिके (वय १९, रा. विनयनगर, नाशिक), किशोर कल्याण चनघटे (वय २१, रा. औरंगाबाद), भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय २५, रा. औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन दुचाकी, सोन्याचे, हिर्‍याचे दागिने, कॅमेरा असा साडेसतरा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

संदीप, मंगेश व राहुल या तिघांनी मिळून सिंध सोसायटीतील दाम्पत्याला २५ एप्रिल रोजी १५ लाख ८० हजार रुपयांना लुटले होते. तर या सहा जणांनी ३ मार्च रोजी वृंदावन सोसायटीत एका ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले होते.

सिंध सोसायटीतील गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणावरून मिळालेल्या माहितीनुसार हा दरोडा संदीप हांडे व त्याच्या साथीदारांनी टाकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी पुणे, औरंगाबाद, जालना शहरात छापे घालून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, महेश भोसले, कर्मचारी दिनेश गंडाकुश, मुकुंद तारु, प्रकाश आव्हाड, श्रीकांत वाघवले, प्रमोद शिंदे, संतोष जाधव, ज्ञानेश्वर मुळे, सुधाकर माने, जारवाल यांच्या पथकाने केली.

.....

लाखो रुपयांना लुटले

संदीप हांडे हा सराईत गुन्हेगार असून तो या टोळीचा प्रमुख आहे. त्याने कोथरुड येथेही एका दाम्पत्याला लुटले होते. त्या गुन्ह्यात त्याच्यासह तिघांना अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्याने इतरांच्या मदतीने हे दोन्ही गुन्हे केले. त्याने आतापर्यंत विविध शहरात १६ ते १७ नर्सिंग ब्युरोत केअर टेकर पदासाठी नोंदणी केली आहे. त्याने पिंपरी चिंचवड परिसरातील एका ज्येष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवून टॉवेलने हात बांधून बाथरुममध्ये कोंडले होते. त्यानंतर घरातील सव्वा चार लाखांचा ऐवज लुटला होता. निगडी पोलिसांनी त्याला अटक केली होती. संदीप हांडे व त्याचा साथीदार मिथुन या दोघांनी केअर टेकर म्हणून काम करताना सिंध सोसायटीतील याच ज्येष्ठ दाम्पत्याच्या डेबिट व क्रेडिट कार्डाचा नंबर मिळवून त्याद्वारे २०१९ मध्ये एटीएममधून परस्पर पैसे काढून पावणे दोन लाखांना गंडा घातला होता.

......

पुण्यात एकटे राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊनमुळे त्यांची मुले बाहेर असल्याने अनेकदा त्यांची काळजी घेण्यासाठी केअर टेकरचा आधार घेतला जातो. अशावेळी केअर टेकर ठेवताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नोंदणीकृत एजन्सीकडून पूर्ण खात्री केल्यानंतरच केअर टेकर घ्यावा.

- पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त

.........

केअर टेकर ठेवताना घ्या काळजी

* केअर टेकर ठेवताना त्याची संपूर्ण माहिती घ्यावी

* केअर टेकरला अधिकची माहिती देऊ नये

* केअर टेकरकडून आर्थिक व्यवहार करून घेऊ नये

* त्यांना आपल्या बँकेची गोपनीय माहिती देऊ नये

* घरातील सोने-नाणे, चीज-वस्तू कोठे ठेवल्या आहेत, याची माहिती देऊ नये

फोटो - केअर टेकर क्राईम

Web Title: A gang of robbers who became care takers was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.