दरोड्याच्या तयारीतील टोळीला पकडले
By Admin | Updated: July 13, 2015 04:28 IST2015-07-13T04:28:44+5:302015-07-13T04:28:44+5:30
दरोड्याच्या तयारीत निघालेल्या सशस्त्र टोळीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद केले. निंबूत (ता. बारामती) येथील पठारवस्ती मार्गावर

दरोड्याच्या तयारीतील टोळीला पकडले
वडगाव निंबाळकर : दरोड्याच्या तयारीत निघालेल्या सशस्त्र टोळीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद केले. निंबूत (ता. बारामती) येथील पठारवस्ती मार्गावर रविवारी (दि. १२) रात्री दीडच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने सर्व जण आले होते. या वेळी चौघांना पाठलाग करून पकडले आहे, तर तिघेजण पळून गेले आहेत. पकडलेल्या चौघांना न्यायालयाने बुधवार (दि. १५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुक्तार गफूर देशमुख (वय ४०), सतीश कारभारी पवार (वय ३६, दोघेही रा. बारगाव नांदुर, ता. राहुरी, जि. अहमदनगर), बाळू संभाजी वाघ (वय २५, रा. चास, जि. अहमदनगर), दादू भैजुमन साळवे (वय ४७, रा. राहुरी, जि. अहमदनगर) अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर नीलेश आरूडे, बाळू जाधव, संजय बरमे हे तिघे पळून गेले आहेत.
शामराव काकडे यांच्या घरापाठीमागे पठारवस्ती मार्गावर अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो (एमएच १७/एजी ७०९४) संशयितरीत्या फिरत होता.
याबाबत माहिती ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून पोलीस ठाण्याला कळवली. ठाणे अंमलदार आर. डी. गायकवाड यांनी याबाबतची माहिती रात्रीच्या गस्ती पथकाला दिली. सहायक फौजदार जगदाळे, दिलीप जगताप यांनी पोलीस गाडी निंबूत येथे नेली. येथे महेश काकडे, उदय काकडे, ज्ञानेश्वर गडदरे, अमित काकडे यांच्यासह काही ग्रामस्थ पोलिसांची प्रतीक्षा करीत होते. पोलीस व ग्रामस्थ एकत्र पठारवस्ती मार्गावर आले. या वेळी सहा ते सात जण टेम्पोत आढळले. पोलीस आपल्या दिशेने येत असल्याची चाहूल लागताच सर्वांनी टेम्पोतून उतरून धूम ठोकली. पोलीस व ग्रामस्थांनी या चोरट्यांचा पाठलाग केला. यामध्ये चौघे जण सापडले आहेत. तर तिघे जण रस्त्यालगत उसाच्या शेतात पळून गेले. (वार्ताहर)