गणेश मंडळ करणार स्तनाच्या कॅन्सरची जागृती
By Admin | Updated: September 8, 2016 01:54 IST2016-09-08T01:54:34+5:302016-09-08T01:54:34+5:30
नाग फाउंडेशनच्या वतीने स्तनांच्या कर्करोगाविषयी जागृती करण्यासाठी गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे

गणेश मंडळ करणार स्तनाच्या कॅन्सरची जागृती
पुणे : गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक विषयांवर जनजागृती केली जात असताना नाग फाउंडेशनच्या वतीने स्तनांच्या कर्करोगाविषयी जागृती करण्यासाठी गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने कोरेगाव पार्क येथे या मंडळाची स्थापना करण्यात आली असून, याद्वारे महिलांना नियमितपणे तपासणी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
कोरेगाव पार्क भागाच्या नगरसेविका वनिता वागस्कर यांनी नाग फाउंडेशनच्या मदतीने हे मंडळ स्थापन करण्याचा हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. याद्वारे याठिकाणी भेट देणाऱ्यांमध्ये या रोगासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबत कर्करोगतज्ज्ञ आणि नाग फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ. शोना नाग म्हणाल्या, की भारतात स्तनांच्या कर्करोगपासून बऱ्या झालेल्या लाखो स्त्रिया आहेत. महिलांचे आरोग्य महत्त्वाचे असून, स्तनांचा कर्करोग हा महिलांमधील कर्करोगांमधील सर्वाधिक होणारा रोग आहे. स्तनांच्या कर्करोगाचे अनेक रुग्ण खूप उशिरा येतात व त्यामुळे उपचार करणे कठीण होते. जर महिला स्वत: निरीक्षण करू शकल्या आणि स्तनांच्या तपासणीसाठी नियमितपणे आल्या, तर आम्ही अनेक जीव वाचवू शकतो. आजच्या घडीला अधिकाधिक लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.
वनिता वागस्कर म्हणाल्या, की गेल्या काही वर्षांत पुण्यातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते आहे. गणेशोत्सवाच्या लोकप्रियतेचा वापर करून आम्ही हा संदेश पोहोचवू इच्छितो, की स्तनांच्या कर्करोगाचे लवकर निदान झाले, तर जीव वाचविता येतो.