२ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात रंगणार ‘गानसरस्वती महोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 07:51 PM2018-01-23T19:51:54+5:302018-01-23T19:52:34+5:30

नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी येत्या  २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात ‘गानसरस्वती महोत्सव’ रंगणार आहे.

 'Ganasaraswati Mahotsav' to be played in Pune from February 2 to 4 | २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात रंगणार ‘गानसरस्वती महोत्सव’

२ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात रंगणार ‘गानसरस्वती महोत्सव’

googlenewsNext

पुणे : नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी येत्या  २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पुण्यात ‘गानसरस्वती महोत्सव’ रंगणार आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खाँ आणि पं. कुमार गंधर्व यांचे पुत्र मुकुल शिवपुत्र यांचे गायन, प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया व सारंगीवादक साबीर खाँ जुगलबंदी आणि पं. बुधादित्य मुखर्जी यांचे सतारवादन अशा सुरेल अविष्कारांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. किशोरीताईंच्या छायाचित्रांचे दालन हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. प्रतिष्ठानचे विश्वस्त रघुनंदन पणशीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत
महोत्सवाची घोषणा केली. राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे सायंकाळी ५ वाजल्यापासून महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच त्यांच्या नावाने सुरु असलेला हा महोत्सव पार पडत असून, या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देण्यात आहे. 

प्रख्यात ज्येष्ठ कलाकारांबरोबरच उदयोन्मुख कलाकारांचाही आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहेत. शुक्रवार दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता महोत्सवाला सुरूवात होणार आहे. गायिका अपर्णा पणशीकर आपल्या सुश्राव्य गायनाने महोत्सवास
प्रारंभ करतील. त्यांच्यानंतर बासरीवादक शशांक सुब्रह्मण्यम यांचे कर्नाटक शैलीतील बासरी वादन होणार आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खाँ यांच्या स्वरमैफिलीने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होणार आहे.

महोत्सवाच्या दुस-या दिवशी शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी राजेंद्र गंगाणी व सहकलाकार ऋजुता सोमण यांचे कथक नृत्य होणार आहे. त्यानंतर मंजिरी असनारे- केळकर यांचे गायन होईल. पं. मुकुल शिवपुत्र यांच्या स्वर्गीय स्वरांची जादू अनुभवता उत्तरार्धात अनुभवता येईल.
रविवार दि. ४ फेब्रुवारी महोत्सव दोन सत्रात रंगणार आहे. रोजीचे  सकाळचे सत्र सकाळी ९ वाजता सुरु होणार असून, या सत्रात किशोरीताईंचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर आपल्या विशेष सादरीकरणातून गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या स्मृतींना स्वरांजली वाहणार आहेत.  महोत्सवाच्या अंतिम सत्रात प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया व सारंगीवादक साबीर खाँ यांच्या जुगलबंदीचा आस्वाद घेता येईल. पं. बुधादित्य मुखर्जी यांचे सतारवादन आणि सुप्रसिद्ध गायिका पं. अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन अशा कलाविष्कारांनी गानसरस्वती महोत्सवाची सांगता होणार आहे. हा महोत्सव राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे होणार आहे. यंदा महोत्सवात प्रथमच 250 अशी मर्यादित रसिकांसाठी भारतीय बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

’गानसरस्वती’ पुरस्कार मंजिरी असनारे-केळकर; साथसंगीत पुरस्कार माऊली टाकळकर, 'गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार' बुधादित्य मुखर्जी यांना जाहीर यंदाच्या  महोत्सवात प्रथमच ‘गानसरस्वती’ पुरस्कार देण्यात येणार असून, पहिल्या पुरस्काराच्या मानकरी गायिका मंजिरी असनारे- केळकर ठरल्या आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून 'नाट्यसंपदा प्रतिष्ठान'वतीने संगीतसेवेकरिता देण्यात येणारा 'गानसरस्वती किशोरी आमोणकर साथसांगत पुरस्कार' हा माउली टाकळकर यांना तर 'गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार' हा बुधादित्य मुखर्जी यांना प्रदान करण्यात येणार आहे. दोन्ही पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे 51 हजार रूपये आणि 1 लाख 20 हजार रूपये असे आहे.

Web Title:  'Ganasaraswati Mahotsav' to be played in Pune from February 2 to 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.