लोकमत ‘ती’चा गणपती पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:14 IST2021-09-16T04:14:48+5:302021-09-16T04:14:48+5:30

श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर. विषय : महिलांसंदर्भातल्या कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबाबत... महोदय, सप्रेम नमस्कार. प्रथमत: आपणास, आपल्या ...

Ganapati letter of Lokmat 'Ti' | लोकमत ‘ती’चा गणपती पत्र

लोकमत ‘ती’चा गणपती पत्र

श्री. अमिताभ गुप्ता,

पोलीस आयुक्त, पुणे शहर.

विषय : महिलांसंदर्भातल्या कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबाबत...

महोदय,

सप्रेम नमस्कार.

प्रथमत: आपणास, आपल्या कुटुंबीयास, तसेच पुणे पोलीस दलास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

काही दिवसांपूर्वीच पुणे रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन लेकीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली. मात्र, यातील आरोपींपर्यंत आपण ज्या त्वरेने आणि तडफेने पोहोचलात त्याबद्दल पुणे पोलिसांचे आणि आपले मनापासून अभिनंदन. संबंधित आरोपींना कायद्यातील सर्वांत कडक शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे आपण न्यायालयासमोर सादर कराल, असा विश्वास वाटतो.

मात्र, हे कौतुक आणि अपेक्षा व्यक्त करत असतानाच काही चिंता आवर्जून व्यक्त करण्यासाठी हा पत्रप्रपंच आहे. आपण जाणताच की गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचार वाढल्याची स्थिती आहे. कधीकाळी मुली, तरुणी, महिलांसाठी अत्यंत सुरक्षित मानले जाणारे पुणे तसे राहिले आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. वास्तविक परस्त्रीला मातेसमान मानण्याचा संस्कार देणाऱ्या जिजाऊ, सावित्रीबाई, रमाईंचा हा महाराष्ट्र. माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने टाकण्याचेही धाडस होणार नाही असा छत्रपती शिवरायांचा जाज्ज्वल्य आदर्श. मात्र, या लौकिकाला महाराष्ट्रात आणि विशेषत: पुणे परिसरात चांगलेच हादरे बसत आहेत.

लोकमत ‘ती’चा गणपती ही अभिनव चळवळ आठ वर्षांपूर्वी सुरू झाली, तीच मुळी स्त्रीचा सन्मान, ‘ती’ची प्रतिष्ठा समाजाने मान्य करावी म्हणून. सन्मान ही बाब कोणी मागितल्यावर द्यायची नसते. ‘पुरुषांच्या बरोबरीने आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बरोबरीने कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रियांचा तो अधिकार आहे, हक्क आहे’ ही भावना लोकमत ‘ती’चा गणपती या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. ‘बाप्पा...संकल्पसिद्धीचा’ ही संकल्पना घेऊन शहरातल्या विविध क्षेत्रातील जागरूक महिलांनी ‘लोकमत ती’चा गणपतीपाशी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

याच अनुशंगाने सर्व पुणेकर स्त्रियांच्या वतीने लोकमत ‘ती’चा गणपती हे व्यासपीठ आपणास आवाहन करत आहे की, स्त्रियांच्या सन्मानाला, प्रतिष्ठेला धक्का लावू पाहणाऱ्या प्रत्येक घटकाला आपल्या पोलीस दलाने कायद्याच्या कक्षेत आणून कडक शासन होईल, अशी व्यवस्था निर्माण करा. माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणी हिंमत करणार नाही, असा धाक आपण निर्माण करा. पुणे पोलीस दलाविषयी पुणेकरांना आदर आहे. अपेक्षाही आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी बाप्पा आपल्याला सर्व शक्ती प्रदान करो, ही शुभेच्छा.

धन्यवाद.

Web Title: Ganapati letter of Lokmat 'Ti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.