शालेय साहित्यासाठी गजबजली बाजारपेठ
By Admin | Updated: June 8, 2015 05:34 IST2015-06-08T05:33:34+5:302015-06-08T05:34:22+5:30
राज्य शासनातर्फे केवळ अनुदानित शाळांमधील्य पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे मोफत वाटप केले जाते.

शालेय साहित्यासाठी गजबजली बाजारपेठ
पुणे : राज्य शासनातर्फे केवळ अनुदानित शाळांमधील्य पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे मोफत वाटप केले जाते. मात्र, विनाअनुदानित, खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके आणि वह्यांची खरेदी करावी लागते. त्यातच पुढील आठवड्यात बहुतांश सर्वच शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शालेय साहित्य खरेदीसाठी पालक व विद्यार्थ्यांच्या गर्दीने शहरातील बाजारपेठा रविवारी गजबजून गेल्याचे दिसून आले.
शहरातील इंग्रजी माध्यमाच्या बहुतांश सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. तर मराठी माध्यमाच्या शाळा येत्या १५ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे पाठ्यपुस्तके, वह्या, स्कूल बॅग आदी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी अप्पा बळवंत चौकातील शालेय साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये गर्दी केली होती़ चालू शैक्षणिक वर्षात राज्य शिक्षण मंडळाची पाचवीची पुस्तके बदलली आहेत. त्यामुळे केवळ पाचवीच्या पुस्तकांच्या किमतीत बदल झाला आहे. गेल्या वर्षी पाचवीच्या पुस्तकांचा संच १०५ रुपयांना मिळत होता. त्यात दुपटीने वाढ झाली असून यंदा पाचवीच्या पुस्तकाचा संच २११ रुपयांना उपलब्ध आहे. पाचवी वगळता सर्व पुस्तकांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
विद्यार्थ्यांकडून नेहमीच मागणी असलेल्या ठराव्ीाक कंपनीच्या वह्यांच्या कितमीमध्ये यंदा कोणतीही वाढ झालेली नसल्याचे शालेय साहित्य विक्रेते जीतूभाई राजवाडा यांनी सांगितले. ते म्हणाले, स्पर्धा वाढल्यामुळे वह्यांच्या कितमीमध्ये यंदा कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, कंपासपेटी, पेन आदी लहान साहित्यांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
मनोज सुतार म्हणाले, शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी चित्रकलेच्या परीक्षा देत असतात. चित्रकलेसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य एका ‘कीट’ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. वह्या पुस्तकांबरोबरच विविध बॅग, टिफिन बॉक्स, कंपासपेटी, स्केच पेन, एक्साम पॅड, वॉटरबॅग अशा विविध साहित्यांची खरेदी करण्यासाठी
पालक आपल्या मुलांना घेऊन बाजारात येत आहेत.