भरदिवसा घरफोडी करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST2021-02-05T05:15:01+5:302021-02-05T05:15:01+5:30
पुणे : पुणे-सातारा रस्ता परिसरात निर्मल पार्क सोसायटीतील फ्लॅटचे कुलूप तोडून दीड लाखांची रोकड आणि दागिने असा ४ लाख ...

भरदिवसा घरफोडी करणारा गजाआड
पुणे : पुणे-सातारा रस्ता परिसरात निर्मल पार्क सोसायटीतील फ्लॅटचे कुलूप तोडून दीड लाखांची रोकड आणि दागिने असा ४ लाख १७ हजारांचा ऐवज लांबविणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून वाहनचोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत. त्याच्याकडून ३ दुचाकी आणि ऐवज असा पावणेपाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
निर्मल पार्क सोसायटीत गेल्या वर्षी भरदिवसा दोन फ्लॅटची कुलूप तोडून ऐवज लांबविण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत सोसायटीतील रहिवाशांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. शहरातील वेगवेगळ्या भागातील सोसायट्यांमध्ये शिरून बंद असलेल्या सदनिकांचे कुलूप तोडून चोरी करणारा चोरटा मांजरी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून शशिकांत अनंत माने (वय २४, रा. हाकेनगर, मांजरी, हडपसर) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक आयुक्त सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभिरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सुधीर घाडगे, बापू खुटवड, विजय मोरे, प्रकाश मरगजे यांनी ही कामगिरी केली.