गजा आणि रुप्या मारणेची वरात!
By Admin | Updated: December 16, 2014 04:15 IST2014-12-16T04:15:50+5:302014-12-16T04:15:50+5:30
कुख्यात गजा मारणे आणि त्याचा पुतण्या रुपेश मारणे या दोघांची कोथरूड आणि दत्तवाडीमध्ये पोलिसांनी चांगलीच ‘वरात’ काढली

गजा आणि रुप्या मारणेची वरात!
पुणे : कुख्यात गजा मारणे आणि त्याचा पुतण्या रुपेश मारणे या दोघांची कोथरूड आणि दत्तवाडीमध्ये पोलिसांनी चांगलीच ‘वरात’ काढली. बेड्या घालून या दोघांनाही कोथरूड आणि दत्तवाडीतील त्यांच्या तसेच फरार आरोपींच्या घरी फिरवून पोलिसांनीही त्यांची ‘भाईगिरी’ दाखवून दिली. गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी कडक पावले टाकायला सुरुवात केली आहे.
स्वत:ला ‘महाराज’ म्हणवून घेणाऱ्या गजाची कोथरूड आणि त्या भागत चांगलीच दहशत आहे. राजकीय वजन राखून असलेल्या गजाने स्वत:च्या टोळीचे साम्राज्य शहरभर पसरवले आहे. त्याच्या भाईगिरीचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे पोलिसांनीही तावात येत खाकीची ‘भाईगिरी’ दाखवायला सुरुवात केली आहे. बेड्या घातलेल्या गजा मारणे आणि रुप्याला कोथरूडमध्ये तपासासाठी नेण्यात आले होते. या गुन्ह्यात फरारींच्या, अटक आरोपींच्या तसेच त्यांच्या स्वत:च्या घरीही या काका-पुतण्याला नेण्यात आले. पोलिसांनी या सर्वांच्या घराची कसून झडती घेतली.
गँगस्टर गजा मारणे याला त्याच्या कोथरूडमधील घराजवळ बेड्या घालून फिरवण्यात आले आणि त्याच्या घराची झडतीही घेण्यात आली. फरारी आणि पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी त्याला दत्तवाडी आणि कोथरूड येथील इतर आरोपींच्या घरीही नेण्यात आले. अमोल बधे खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडे असून, पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)