महावितरणच्या कारभारावर रोष

By Admin | Updated: July 1, 2015 23:49 IST2015-07-01T23:49:54+5:302015-07-01T23:49:54+5:30

चुकीची बिले पाठविल्याने अनेक वीजग्राहक नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या समस्येस शहरातील शेकडो नागरिकांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे.

Fury on the affairs of MSEDCL | महावितरणच्या कारभारावर रोष

महावितरणच्या कारभारावर रोष

पिंपरी : चुकीची बिले पाठविल्याने अनेक वीजग्राहक नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या समस्येस शहरातील शेकडो नागरिकांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे. या विषयास ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
‘ग्राहकांना भरमसाठ वीजबिलाचा शॉक’ या शीर्षकाखाली लोकमतने बुुधवारी ठळक वृत्त प्रसिद्ध केले. मीटरचे छायाचित्र न घेताच अंदाजे सरासरी रीडिंग टाकून बिल पाठविण्याचा प्रकार शहरातील सर्वच भागांत वाढला आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तडजोड केल्याचे दाखवीत रक्कम थोडी फार कमी केली जाते. मात्र, पुढील बिलात पुन्हा ही रक्कम वाढून येते. पुन्हा तक्रार करीत वेगवेगळी कार्यालये पालथी घालावी लागतात. यात वेळ आणि प्रवासाचा अतिरिक्त भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. काहींना मुदतीनंतर बिले पाठविली जातात. त्यामुळे वाढीव बिलासोबत दंडाची रक्कमही भरावी लागते. हा आर्थिक भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामध्ये नागरिकांची काहीच चूक नसते.
या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांसह, व्यापारी, लघुउद्योजक यांच्या तक्रारी आहेत. वीजजोड खंडित कारवाईमुळे अंधारात राहण्याची वेळ येईल म्हणून नाईलाजास्तव अनेक जण निमूटपणे बिल भरून मोकळे होतात. मात्र, वीज कंपनीच्या कामकाजात सुधारणा होताना दिसत नाही. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अधिक रक्कम भरावी लागत आहे.
पिंपळे गुरव येथील चक्रनारायण नाथन यांनी अधिक रीडिंगचे बिल येत असल्याची तक्रार पिंपरी विभागीय कार्यालयात केली. मीटर तपासा किंवा तो बदलून द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. मीटरची तपासणी करून रीडिंग चुकीचे येत असल्यास ते बदलून दिले जाणार असल्याचे पिंपरीचे कार्यकारी अभियंता डी. आर. औंढेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

केवळ तीनच तक्रारी
पिंपरी विभागीय कार्यालयांतर्गत एकूण २ लाख ८६ हजार, तर भोसरी विभागीय कार्यालयांतर्गत एक लाख ८० हजार ग्राहक आहेत. पिंपरीत केवळ ३ तक्रारी आल्या. भोसरीत तर एकही तक्रार आली नाही.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन घेण्यात येतो. पिंपरी कार्यालयात वाढीव वीज बिल आले असून, मीटर बदलून द्यावा,अशी एक तक्रार पिंपळे गुरव येथील रहिवाशाने केली. तीन दिवसांसाठी तात्पुरता वीजजोड घेतला होता. त्यासाठी भरलेली सुरक्षा ठेव परत करावी, अशी तक्रार जाधव कॉलनी, पिंपरीतील एकाने केली. ही ठेव गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भरली होती. घरमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना भाडेकरूस वीजजोड दिल्याची तक्रार दापोडीतील एका रहिवाशाने केली. या संदर्भात बिलिंग विभागाचे श्रीकृष्ण बागे आणि तांत्रिक विभागाचे एस. एम. क्षीरसागर यांनी तक्रारी स्वीकारल्या. तक्रारींवर त्वरित तोडगा काढण्याचा सूचना कार्यकारी अभियंता डी. आर. औंढेकर यांनी दिल्या आहेत.
भोसरीत एकही तक्रार आली नाही, अशी माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भरणे यांनी दिली. नियमितपणे तक्रारी येतात. फोनवरही तक्रारी घेतल्या जातात. अधिकारी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे त्वरित कारवाई होऊन नागरिकांचे समाधान केले जाते. त्यामुळे तक्रार निवारण दिनाची कोणी वाट बघत बसत नाही. पाच वर्षांपूर्वी १० ते २० तक्रारी या दिवशी येत. सध्या ही संख्या नाही इतकी आहे. गेल्या महिन्यातही एकही तक्रार आली नाही, असे भरणे यांनी सांगितले.

Web Title: Fury on the affairs of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.