वडिलांवर अंत्यसंस्कार करून दिला दहावीचा पेपर
By Admin | Updated: March 10, 2015 04:48 IST2015-03-10T04:48:46+5:302015-03-10T04:48:46+5:30
शिकून खूप मोठा हो! ही आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने दहावीच्या परीक्षेची जोरदार तयारी करून दोन पेपर दिले.

वडिलांवर अंत्यसंस्कार करून दिला दहावीचा पेपर
चाकण : शिकून खूप मोठा हो! ही आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने दहावीच्या परीक्षेची जोरदार तयारी करून दोन पेपर दिले. अशातच पितृछत्रही हरपले. वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उरकून त्याने आईची ती इच्छा अपूर्ण राहू नये, म्हणून डोगंराएवढे दु:ख पचवत त्याने दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. येथील महात्मा फुलेनगर झोपडपट्टीमधील एका अपंग विद्यार्थ्याने हे धैर्य दाखवलं. सूरज नागेश गालफाडे असे त्याचे नाव आहे.
पितृछत्र हरपले की भलेभले हतबल होतात; पण त्यानेही जिद्दीने दोन लहानग्या बहिणींच्या भविष्याचा विचार करीत दु:खद आवंढा गिळून परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे दोन पेपर दिल्यानंतर तिसऱ्या पेपरला आजाराशी झुंज देणारे सूरजचे वडील नागेश शंकर गालफाडे (वय ४७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आई नाही, अचानक वडिलांचे छत्र हरपले, भाऊ नाही, केवळ वयोवृद्ध आजोबा आणि दोन चिमुकल्या बहिणी. सूरज स्वत: एका हाताने व पायाने अपंग आहे. मात्र समाजाने सूरजला बळ दिले.
सूरजच्या आईचे निधन झाल्यापासूनच वडिलांची तब्येत खालावू लागली होती. आजोबांच्या मदतीने तो घर सांभाळत होता. त्याचबरोबर अभ्यासही सुरू होता. आजार बळावल्याने वडिलांचे ऐन परीक्षेत निधन झाले. (वार्ताहर)