तीर्थक्षेत्र नृसिंहपूरच्या विकासासाठी निधी देणार
By Admin | Updated: October 30, 2015 00:04 IST2015-10-30T00:04:55+5:302015-10-30T00:04:55+5:30
पवित्र तीर्थक्षेत्र नीरा-नृसिंहपूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कामांचा विकास आराखडा त्वरित मंजूर करून निधी उपलब्ध केला जाईल

तीर्थक्षेत्र नृसिंहपूरच्या विकासासाठी निधी देणार
बावडा : पवित्र तीर्थक्षेत्र नीरा-नृसिंहपूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कामांचा विकास आराखडा त्वरित मंजूर करून निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथे नीरा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते आज करण्यात आले.
बापट म्हणाले, की श्री नृसिंहाच्या पवित्र, धार्मिक, सांस्कृतिक ठिकाणी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून सेवा करण्याचे भाग्य लाभले. देव स्वत: खात नाही. दुसऱ्यास आत्मविश्वासस्वरूपी आशीर्वाद देतो. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित झालेले हे तीर्थक्षेत्र आगामी दोन-तीन वर्षांत नावारूपास आणू. इतकेच नव्हे, तर एक नंबरचे तीर्थक्षेत्र बनवू. यासाठी कितीही खर्च झाला तरी मागे हटणार नाही. राज्याचा विकास करीत असताना प्रसंगी कर्ज काढावे लागले, तरीही विकासकामे थांबू देणार नाही. भाजपा-सेना सरकार एक वर्ष पूर्ण करीत असतानाच कोट्यवधीची विकासकामे घडवून आणली आहेत. या तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा २७५ कोटींवर नेला असून, तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार आहे. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा दुसऱ्याचा सन्मान करण्यास शिकावे.
भरणे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांचे हे तीर्थक्षेत्र कुलदैवत असल्याने त्यांनी येथील विकासकामे तातडीने हाती घेतली आहेत. या ठिकाणी भीमा नदीवर बंधारा बांधण्याचे कामही लवकरच हाती घेतले जाईल.
प्रास्ताविक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे म्हणाले, की या पुलासाठी नाबार्डकडून आठ कोटी रुपये उपलब्ध झाले आहे. सुमारे पाच महिन्यांतच काम पूर्ण होईल. या पुलाची अठरा मीटर लांबी आहे. नीरा-नृसिंहपूर परिसरातील तीर्थक्षेत्राची कामे दर्जेदार करू.
या वेळी प्रदीप गारटकर, अप्पासाहेब जगदाळे, बाबासाहेब चवरे, महेश इंगळे आदींची भाषणे झाली. जिल्हाधिकारी सौरभ राव, भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली चौरे, सभापती सोनाली ननवरे, इंदापूरचे बांधकाम उपअभियंता लक्ष्मीकांत जाधव, शाखा अभियंता सावळे, उमेश घोगरे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ मोरे, सरपंच रूपाली काळे आदी उपस्थित होते.
या वेळी या पुलासाठी शेतातून जागा दिल्याबद्दल केशवराव काटे, विठ्ठलराव काटे, यशवंत काटे-देशमुख, ठेकेदार श्रीमंत तांदुळकर व शिवाजी थोरवे यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.