अर्धवेळ कामाचा ३५० जणांना पूर्ण पगार
By Admin | Updated: January 21, 2015 00:28 IST2015-01-21T00:28:15+5:302015-01-21T00:28:15+5:30
महापालिकेच्या आरोग्य खात्यांतर्गत कीटक प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत असलेल्या ३५० जणांना अर्धवेळ कामाचा पूर्ण पगार गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहे.

अर्धवेळ कामाचा ३५० जणांना पूर्ण पगार
दीपक जाधव - पुणे
महापालिकेच्या आरोग्य खात्यांतर्गत कीटक प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत असलेल्या ३५० जणांना अर्धवेळ कामाचा पूर्ण पगार गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहे. त्यांचे कामाचे तास वाढविण्याच्या प्रस्तावाची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही १ वर्ष उलटले, तरी आयुक्तांची मान्यता घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांवर पालिका दाखवत असलेल्या या विशेष मर्जीमुळे शहराच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
शहरामध्ये डासअळीनाशक, डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया या रोगांचा फैलाव होऊ नये, म्हणून कीटकनाशक व औषधांची फवारणी केली जाते. या कामाकरिता आरोग्य विभागाकडून ३५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी दीड अशी आहे. अवाढव्य पसारा असलेल्या पुणे शहराकरिता केवळ ३५० कर्मचारी नेमले आहेत. त्यांच्याकडूनही अर्धवेळच काम केले जाते.
शहरातील कीटकनाशक फवारणीची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे आढळून आले आहे. सकाळी साडेसात वाजता कर्मचाऱ्यांनी कामावर येणे अपेक्षित असताना ते उशिरा कामावर येतात. बायोमेट्रिक हजेरीची पद्धत सुरू करण्यात आली आहे; मात्र हजेरी लावून कर्मचारी पसार होत असल्याचे आढळून येत आहे. सहा तासांच्या कामामध्ये दुपारचे जेवण, चहापान यांत त्यांचा वेळ जातो. त्यानंतर दीड वाजताच ते लगेच घरचा रस्ता पकडतात. त्यामुळे त्यांचे ड्युटीचे तास ६ वरून ८ करावेत, असा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यावर कामगार सल्लागार व प्रशासनाने सकारात्मक शेरे दिले आहेत.
शहरामधील नदीकिनारे, खड्डे, बांधकामाची धूळ, नाले, गटारे या ठिकाणी महापालिकेकडून नियमित कीटकनाशक व औषध फवारणी केली जाते. मध्यंतरीच शहरात डेंगीचा फैलाव झाला होता. डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया अशा साथी अत्यंत वेगाने पसरतात. चुकून रोगाची उत्पत्ती झाल्यास त्याला अटकाव करणे खूप अवघड जाते. त्यामुळे औषधफवारणीची मोठी आवश्यकता आहे. मोठ्या शहरांमध्ये या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जाते.
माननीयांचे नातेवाईक
कीटक प्रतिबंधक विभागामध्ये माननीयांचेच अनेक नातेवाईक कामाला लागले आहेत. त्यामुळे त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास ते लगेच माननीयांकडे धाव घेत असल्याने ‘जे चालल्ांय ते चालू द्या’ अशी भूमिका वरिष्ठांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे कामाचे तास वाढविण्याची फाईल पुढे सरकत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
कीटकनाशक प्रतिबंधक विभागातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे तास ६वरून ८ करावेत, याकरिता आरोग्य विभागानेच प्रस्ताव प्रशासनाकडे दिला आहे. त्यावर लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल.
- एस. टी. परदेशी,
प्रभारी आरोग्यप्रमुख