फरार भाजप माजी नगरसेवकाला राजस्थान सीमेवर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:51+5:302021-07-23T04:08:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमन्यातून बबलू गवळीचा खुन करण्यासाठी हत्येची सुपारी दिल्याप्रकरणात फरार असलेल्या पुणे कँटोन्मेट बोर्डाचा माजी ...

फरार भाजप माजी नगरसेवकाला राजस्थान सीमेवर पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्ववैमन्यातून बबलू गवळीचा खुन करण्यासाठी हत्येची सुपारी दिल्याप्रकरणात फरार असलेल्या पुणे कँटोन्मेट बोर्डाचा माजी उपाध्यक्ष आणि भाजपाचा माजी नगरसेवकाला कोंढवा पोलिसांनी गुजरात राजस्थानच्या सीमेवर जेरबंद केले.
कँटोन्मेंट कोर्टाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चेतन जगताप यांनी त्याला २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
विवेक यादव (वय ३८, रा. वानवडी) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. या प्रकरणात राजन जॉनी राजमनी (वय ३८, रा. कोंढवा) आणि इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (वय २७, रा. वाकड) या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून, या तिघांसह एका अज्ञात व्यक्तीविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी कोंढवा पोलिसांनी राजन जॉन राजमणी आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख या दोघांना पिस्तुले बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांना बबलु गवळी याला मारण्यासाठी विवेक यादव याने सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले होते. त्यासाठी या दोघा गुन्हेगारांना यादव याने ३ पिस्तुले व ७ काडतुसे व रोख रक्कम दिली होती.
विवेक यादव हा भाजपचा पुणे कॅन्टोमेंटचा माजी नगरसेवक आहे. बबलु गवळी आणि विवेक यादव यांच्यात पूर्वीपासून दुश्मनी आहे. यादव याच्यावर बबलु गवळी याने २०१६ मध्ये यादव याच्यावर गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीत गोळीबार करुन गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी विवेक यादव याने शिक्षा भोगत असलेला व सध्या कोरोनामुळे जामिनावर बाहेर आलेल्या राजन राजमणी याला सुपारी दिली होती. राजमणी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर विवेक यादव फरारी झाला होता. त्याच्या तपासासाठी वेगवेगळी तीन पथके शोध घेत होती. तो गुजरात बॉर्डरवर असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी काल रात्री गुजरात आणि राजस्थान बाँर्डरवर त्याला पकडले आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून विवेक यादव फरार झाला होता. तो गुजरातमधील अहमदाबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यावर कोंढवा पोलिसांच्या पथकाने गुजरात गाठले. शोध घेत असताना यादव गुजरातमधून राजस्थानमध्ये जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गुजरात-राजस्थान सीमवरील बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी येथे नाकाबंदी लावून यादवला जेरबंद करून पुण्यात आणले.