सुपे (पुणे) : चौफुल्याकडुून भरधाव वेगाने आलेला मालवाहतूक ट्रक येथील डायमंड हॉटेलमध्ये घुसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जण जखमी झाल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे - मोरगाव रस्त्यावरील सोंडवळण परिसरात रविवारी ( दि. २९ ) रात्री दहाच्या दरम्यान घडली.
रुक्साना दिलावर काझी ( वय ४५, रा. सुपे ) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. तर डायमंड हॉटेलचे मालक दिलावर इस्माईल काझी ( वय ५०, रा. सुपे ), मुलगा सोहेल दिलावर काझी ( वय २५ रा. सुपे ), तर मुजाहिद अहमद सय्यद ( सद्या रा. सुपे, मुळ उत्तर प्रदेश ) असे तीन जण जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युनूस इब्राहीम काझी ( वय २९, रा. सुपे ) यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिली. दौंड शुगर येथून साखर भरुन निघालेला ट्रक क्रमांक ( एम.एच.१६सी.सी.६१२३ ) सुपे येथील डायमंड हॉटेलमध्ये घुसल्याने हॉटेलमध्ये असलेल्या महिलेच्या अंगावर ट्रक पडला. तर याठिकाणी असलेले तीन जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली. या बाराचाकी ट्रकमध्ये २५ ते ३० टन साखर होती.
ही घटना ऐवढी भयानक होती की, हॉटेलमध्ये घुसलेल्या ट्रकला क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने उचल्याकरीता दीड तासांचा वेळ गेला. तो ट्रकला क्रेनच्या सहाय्याने उचलल्यावर त्याखालील महिला काढण्यात आली. तिला सुपे येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीचे दाखल केले व पुढील उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यु झाला. तर अन्य तीन पैकी मुजाहिद गंभीर जखमी असून त्याच्यावर दौंड येथे उपचार सुरु आहेत. या संदर्भात अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.