अडीच किलोच्या जटेतून महिलेची मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:11+5:302021-02-05T05:12:11+5:30
बारामती येथील वत्सला शिवरकर (वय ७७) ही महिला गेले ८ वर्षांपासून डोक्यावर २ फूट लांबीची जटांचे अंदाजे दोन ...

अडीच किलोच्या जटेतून महिलेची मुक्तता
बारामती येथील वत्सला शिवरकर (वय ७७) ही महिला गेले ८ वर्षांपासून डोक्यावर २ फूट लांबीची जटांचे अंदाजे दोन ते अडीच किलोचे वजन वागवत होती. अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या या जटांमुळे तिची शारीरिक व मानसिक हानी मोठ्या प्रमाणात झाली होती. वत्सला यांच्या डोक्यामध्ये या जटांमुळे मोठ्या प्रमाणात उवा, लिखा आणि अशा अनेक सूक्ष्म जंतूंचे साम्राज्य तयार झाले होते. याचा विपरीत परिणाम त्या महिलेच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर झाला होता. यामुळे ही महिला खूप त्रस्त झाली होती व खचून गेली होती. बारामतीमधील पिंकी धोत्रे, मोहन भोसले आणि अमोल चोपडे यांनी तिचे समुपदेशन करून केवळ पंधरा मिनिटांत महिलेस जटा मुक्त करण्याचा निर्णय घेतला. ती महिला वेदना असह्य होत असल्यामुळे डोके आपटून घेत होती. त्यानंतर बारामतीमधील सामाजिक कार्यकर्ते मोहन भोसले व मेखळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अमोल चोपडे यांनी स्वत: या असहाय्य महिलेस जटामुक्त केले. वर्षानुवर्षे या जटा डोक्यावर वाढल्यामुळे त्या महिलेच्या डोक्यात उवांचे वारूळ तयार झाले होते व खूप जखमा होत्या, त्यावरही त्यांनी प्रथमोपचार केले. यावेळी नीलेश थोरात, सुशील कोरडे, रणजित कोळेकर, तेजस लकडे, श्रीकांत काळे, दत्ता चव्हाण यांनी ही मोलाचे सहकार्य केले.
देवाच्या नावाखाली महिला जटा ठेवतात आणि स्वत:चे मानसिक व शारीरिक नुकसान करून घेतात. परंतु हा विचार बदलून महिलांनी पुढे येऊन स्वत: अंधश्रद्धेतून मुक्त व्हावे. तसेच जटा काढण्यासाठी व समुपदेशनासाठी संपर्क करावा. - अमोल चोपडे
अंनिस व सामाजिक कार्यकर्ते
वत्सला शिवरकर यांना जटेतून मुक्त करताना अमोल चोपडे.