माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळीबार
By Admin | Updated: November 8, 2015 03:03 IST2015-11-08T03:03:10+5:302015-11-08T03:03:10+5:30
शिरूर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते व वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुभाष कामठे (वय ३८, रा. सविंदणे, ता. शिरूर) यांच्यावर शिक्रापूरजवळ गोळीबार झाला.

माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळीबार
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते व वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुभाष कामठे (वय ३८, रा. सविंदणे, ता. शिरूर) यांच्यावर शिक्रापूरजवळ गोळीबार झाला. त्यामध्ये ते सुखरूप बचावले. ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी ही घटना घडली असून, त्यांच्या दुचाकीच्या हेडलाइटजवळ गोळी आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्रापूर पोलिसांत बुधवारी (दि. ४) फिर्याद दिली असून, पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ आॅक्टोबर रोजी कामठे दुचाकीवरून सविंदणे येथून शिक्रापूर येथील ग्राहक पंचायतीच्या कार्यालयाकडे निघाले होते. या वेळी शिक्रापूरजवळ असलेल्या वेंकटेश कृपा साखर कारखान्यापासून पुढे काही अंतर गेल्यावर, समोरून एक दुचाकी आली. या दुचाकीवर हेल्मेट घातलेले व तोंड झाकलेले, असे तीन जण होते. त्यांनी कामठे यांना हातवारे करत थांबविण्याचा प्रयत्न केला.
या वेळी एकाकडे पिस्तुल होते. कामठे यांच्या दिशेने या वेळी मोठा आवाज झाला व त्यांना खांद्याजवळ इजा जाणवली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७ व आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम. आर. पाटील करीत आहेत. (वार्ताहर)