कर्मचारी वसाहतींच्या विकासाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:15 IST2018-03-24T04:15:58+5:302018-03-24T04:15:58+5:30
महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचे विकसन करण्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी बराच गदारोळ झाला. आधी या विषयावर हात वर करून मतदान घेण्यात आले होते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी लेखी मतदानाची मागणी केली.

कर्मचारी वसाहतींच्या विकासाचा मार्ग मोकळा
पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचे विकसन करण्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी बराच गदारोळ झाला. आधी या विषयावर हात वर करून मतदान घेण्यात आले होते; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी लेखी मतदानाची मागणी केली. तसेच सत्ताधारी भाजपा या वसाहतींच्या विकसनावरून बांधकाम व्यावसायिकाचा फायदा व महापालिकेचे नुकसान करत असल्याचा आरोप करण्यात आला. भाजपाच्या स्पष्ट बहुमतामुळे तसेच काँग्रेसची त्यांना साथ मिळाल्याने हा विषय मंजूर झाला; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या विषयावर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.
या वसाहती पाडून तिथे नव्या वसाहती बांधण्याचा विषय सन १९९० पासून प्रलंबित आहे. नव्यानेच निवडून आलेल्या धीरज घाटे, अजित दरेकर, सोनाली लांडगे, सम्राट थोरात आदी सदस्यांनी प्रयत्नपूर्वक या विषयाला गती दिली. त्यामुळे हा प्रस्ताव आणण्यात आला. २०१०च्या त्या बांधकाम व्यावसायिकालाच हे काम त्याच निविदेनुसार देण्याचा विषय होता. मात्र, तसे करताना त्यात घरांच्या क्षेत्रफळात तसेच बांधकाम व्यावसायिकाला द्यायच्या जागेत काही बदल करण्यात आला. बदल केला तर मग नव्याने निविदा काढायला हवी, असे मत माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी व्यक्त केले व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच सदस्य या विषयावर तुटून पडले. विशाल तांबे, भय्या जाधव, सुनील टिंगरे, बाबूराव चांदेरे आदी सदस्यांनी यावरून भाजपावर टीका केली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले त्यामुळे चिडले. त्यांनी ८ वर्षे तुम्ही झोपला होता का, आता आम्ही विषय मंजूर करतो आहोत तर आडकाठी का आणता, अशी विचारणा केली.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यही चिडले. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला. दत्ता धनकवडे यांनी या विषयाला उपसूचना दिली. त्यात त्यांनी जादा चटई क्षेत्र महापालिकेला मिळावे असे सुचवले. धीरज घाटे, सोनाली लांडगे, आरती कोंढरे, सम्राट थोरात, अजित दरेकर, अजय खेडेकर आदी सदस्यांनी वसावहतींचे विकसन त्वरित व्हावे, असे मत व्यक्त केले. लेखी मतदानात भाजपाच्या बाजूने हा विषय मंजूर झाला.