कोथरूड शिवसृष्टीचा मार्ग मोकळा

By Admin | Updated: January 9, 2017 03:13 IST2017-01-09T03:13:15+5:302017-01-09T03:13:15+5:30

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये

Free the path of Kothrud Shiva | कोथरूड शिवसृष्टीचा मार्ग मोकळा

कोथरूड शिवसृष्टीचा मार्ग मोकळा

पुणे : कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) या जागेवर महापालिकेच्या प्रकल्पासाठी राखीव असे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर या जागेवर प्रस्तावित असलेला मेट्रोचा डेपो कल्याणीनगर येथे हलविण्यात आला आहे.
कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी व्हावी, असा ठराव मुख्य सभेच्या वतीने मंजूर केला होता, तर दुसरीकडे दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने बनविलेल्या आराखड्यानुसार मेट्रोचा डेपो या ठिकाणी दाखविण्यात आला होता. त्यामुळे शिवसृष्टीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मेट्रोचा डेपोच कल्याणीनगर येथे हलविण्यात आल्याने हा विषय मार्गी लागला आहे. मेट्रो वनाझ ते रामवाडी या मार्गावरून धावणार आहे.
शिवसृष्टीच्या जागेचा तिढा निकाली निघाल्याने आगामी महापालिका निवडणुकांनंतर या शिवसृष्टीच्या कामाला वेग येऊ शकतो. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत भावनिक अशा मुद्द्यांवर शासनाने मोठ्या शिताफीने मार्ग काढला आहे. कोथरूडच्या जागेवर मेट्रो डेपोचा निर्णय झाला असता, तर शिवसृष्टीला शासनाने रेड सिग्नल दाखविला, अशी टीका झाली असती.
शहराच्या डीपीला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. डीपीमधील ८५० आरक्षणांमध्ये दोन भाग करण्यात आले आहेत. राज्य सरकारने केलेले बदल ते अंतिम असणार आहेत. नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवून घेण्यात येणारा निर्णय यामध्ये एकूण २३५ आरक्षणे आहेत, तर ४१५ आरक्षणांवर निर्णय घेण्यात आलेला आहे.
शिवसृष्टी या पुणे महापालिकेच्या प्रकल्पाला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांचा जीवनपट येथे शिल्पांच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे.
त्याचबरोबर संग्रहालय, हॉटेल, पार्किंग, मनोरंजन उद्यान, तसेच शिवाजीमहाराजांचा संपूर्ण इतिहासाची मांडणी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी शिवसृष्टीसाठी तरतूद केली जात होती. मात्र प्रकल्पाला राज्य शासनाची अंतिम मान्यता मिळत नसल्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकलेले नव्हते.

Web Title: Free the path of Kothrud Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.