भ्रष्टाचारावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
By Admin | Updated: September 25, 2016 05:46 IST2016-09-25T05:46:51+5:302016-09-25T05:46:51+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये

भ्रष्टाचारावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये जुंपली आहे. महापालिकेतील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपाप्रमाणेच राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत.
महापालिका निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तसा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, मंगला कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, सचिन पटवर्धन, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे, अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारमधील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेच्या खासदारांवर टिका केली जात आहे. केंद्रात व राज्यात युती असली तरी पिंपरी-चिंचवडमध्ये दोघांमध्ये मतभेद दिसून येतात.
राष्ट्रवादी आणि भाजपा नेत्यांत शाब्दिक युद्ध
भाजपाकडून होणाऱ्या टीकेवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वाघेरे यांनी भाष्य केले होते. ‘भाजपा सुडाचे राजकारण करीत आहे. केंद्र आणि राज्यात त्यांचीच सत्ता असल्याने महापालिकेत भ्रष्टाचार झाला असेल, तर चौकशी करू शकतात, असे टीकेला उत्तर दिले होते. त्याचा समाचार भाजपाचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी घेतला आहे.
‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने देवालाही न सोडल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केली आहे, असे खाडे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.(प्रतिनिधी)
लांडगेंचा भाजपा प्रवेश लांबणीवर?
मुंबई येथील मुख्यमंत्र्यांसमवेत आमदार लांडगे यांनी नारळ ग्रुपची बैठक घेतली. लांडगे यांच्या भाजपा प्रवशोची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून राज्यमंत्री दर्जाचे पद याची घोषणा होत नाही, तोपर्यंत लांडगे यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. लांडगे यांचा ग्रुप भाजपात दाखल झाला, तर भोसरीत भाजपाची ताकद वाढणार आहे. लांडगे यांचा भाजपा प्रवेश होऊ नये, म्हणून दस्तुरखुद्द अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. लांडगे यांच्या भाजपा प्रवेशाला भाजपातील एका गटाचा विरोध असला, तरी लांडगेंनी भाजपात यावे, यासाठी मुख्यमंत्री समर्थक प्रयत्न करीत आहेत.
तिसऱ्या यादीतही पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश झाला नाही. केंद्र आणि राज्य सरकारने जाणूनबुजून घाणेरडे राजकारण केले आहे. बेस्ट सिटीने सन्मानित केलेल्या शहराचा समावेश केला नाही. पुन्हा एकदा पिंपरीला ठेंगा मिळालेला आहे. जेएनएनयूआरएममध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपातील काही लोक करीत आहेत. तो चुकीचा आहे. या योजेनेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार, चुकीचे काम
केलेले नाही.
- संजोग वाघेरे
शहराध्यक्ष
विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी, गॅस शवदाहिनी खरेदी, नाशिक फाटा आणि भोसरीतील शीतलबाग येथील पादचारी पुलाच्या कामाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आधीच आदेश दिले आहेत. जेएनएनयूआरएमच्या कामांच्याही चौकशीला लवकरच सुरुवात होईल. राष्ट्रवादीने त्याबाबत चिंता करू नये. राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणामुळे जेएनएनयूआरएम
योजनेत महापालिकेला मिळालेले तब्बल ७०० कोटी रुपये केंद्राकडे परत जाण्याच्या मार्गावर आहेत. केवळ
कशात खायचे, यावरच लक्ष केंद्रित करणाऱ्या राष्ट्रवादीने त्याबाबतही
जनतेला उत्तर द्यावे.
- सदाशिव खाडे
माजी शहराध्यक्ष, भाजपा