चार वाहने आदळली; वाहतुकीचा खोळंबा
By Admin | Updated: October 27, 2014 03:34 IST2014-10-27T03:34:53+5:302014-10-27T03:34:53+5:30
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत चार गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता

चार वाहने आदळली; वाहतुकीचा खोळंबा
पेठ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत चार गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणीही जास्त जखमी झाले नाहीत. मात्र, वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनचालकांना, प्रवाशांना या वाहतूककोंडीचा चांगलाच फटका बसला.
पेठ (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीतून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यावर पुण्याच्या दिशेने चाललेल्या गाड्या एकमेकांवर पाठीमागून आदळल्याने अपघात झाला. या अपघातग्रस्त गाड्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवाजीनगर आगाराची एसटी बस, पिकअप गाडी क्र. एमएच ०६ एजी ३९७८, कार एमएच १४ बीसी ९८६४ व कार एमएच १४ इएच १५९९ या गाड्या एकमेकांवर पाठीमागून आदळल्याने अपघात झाला. अपघातात कोणीही जास्त जखमी झाले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सायंकाळची वेळ असल्याकारणाने या ठिकाणी लवकरच अंधार पडला होता. त्यामुळे अपघात झाल्यानंतर या ठिकाणी रस्त्यावर वाहतुकीची खूप मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. पेठ गावातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन वाहतूककोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आळेफाटा महामार्गाचे वाहतूक पोलीस घटनास्थळी येऊन त्यांनी घटनास्थळाचा ताबा घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. पुण्यावरून येणाऱ्या गाड्यांना पेठ गावातून सोडून अपघात झालेल्या महामार्गावरून फक्त पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली. सुमारे दोन तास वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालकांना, प्रवाशांना ताटकळतच गाडीत बराच वेळ बसावे लागले. (वार्ताहर)