पीपीपी तत्त्वावर शहरातील चार रस्ते व दोन उड्डाणपूल उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:11+5:302021-01-08T04:27:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीपीपी तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) रिझर्व्हेशन क्रेडिट बाँड देऊन शहरातील रस्ते विकसनास पुणे महापालिकेने ...

पीपीपी तत्त्वावर शहरातील चार रस्ते व दोन उड्डाणपूल उभारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीपीपी तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) रिझर्व्हेशन क्रेडिट बाँड देऊन शहरातील रस्ते विकसनास पुणे महापालिकेने प्रारंभ केला आहे़ शहरातील २३ डीपी रस्त्यांपैकी खराडी व मुंढवा येथील चार रस्ते व दोन उड्डाणपूल पीपीपी तत्त्वावर बांधण्याकरिता सल्लागार नियुक्तीच्या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी मान्यता दिली़
राज्य शासन पीपीपी तत्त्वावर रस्ते विकसित करीत आहे. त्याप्रमाणे पुणे महापालिकाही आता रिझर्व्हेशन क्रेडिट बाँडचा वापर करून शहरातील रस्ते बांधणी करून विकासाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करीत असल्याचे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर व स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़
शहराची वाढ व त्या तुलनेत आर्थिक कारणास्तव शहरातील रस्त्यांचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही़ यामुळे शहरातील २३ रस्ते पीपीपी तत्त्वावर विकसित करण्याची तरतूद सन २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात केली आहे़ हे रस्ते क्रेडिट बाँडचा वापर करून पीपीपी तत्त्वावर टप्प्याटप्प्याने विकसित करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला असून, त्यापैकी चार पॅकेजच्या माध्यमातून ५८१ कोटी रुपयांचे चार रस्ते व दोन उड्डाणपूल विससित करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रशासनाच्या प्रस्तावावर आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये एकमताने निर्णय घेतला आहे.
सदर रस्त्यांकरिताची जागा टीडीआर किंवा एफएफआय देऊन ताब्यात घेणे, पीपीपी तत्त्वावर होणाऱ्या कामावर नियंत्रण ठेवणे व महापालिकेची नोडल एजन्सी म्हणून काम करण्याकरिता सल्लागार कंपनीची नियुक्ती करणार आहे़ याकरिता सदर सल्लागार कंपनीस कामाची प्रक्रिया सुरू झाल्यावर एकूण खर्चाच्या २ टक्के रक्कम ही शुल्क म्हणून देणार आहे़ तर सदर कामाकरिता ५८१ कोटी रुपये खर्च येणार असून विकसकाला चार वर्षांत टप्प्याटप्प्याने क्रेडिट बाँड खर्च करण्याचे बंधन घालणार आहे.