माजी सरपंचासह चौघांना अटक
By Admin | Updated: March 10, 2015 04:51 IST2015-03-10T04:51:20+5:302015-03-10T04:51:20+5:30
पुरंदर तालुक्यातील मौजे साकुर्डे येथे एक महिन्यापूर्वी शेतकरी अशोक जाधव यांच्या खून प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले

माजी सरपंचासह चौघांना अटक
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील मौजे साकुर्डे येथे एक महिन्यापूर्वी शेतकरी अशोक जाधव यांच्या खून प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून साकुर्डे गावाच्या माजी सरपंचासह चौघांना पोलिसांनी कट रचून खून केल्याच्या आरोपाखाली रविवारी अटक केली आहे. त्यांना सासवड न्यायालयात हजर केले असता आरोपींना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. पूर्ववैमनस्य व जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुलतान यासीन सय्यद (वय २९), अतुल मारुती सस्ते ( वय २०), धनंजय नाना खोमणे ( वय २५), भानूदास नाना खोमणे (वय २१), आणि मारुती गेणबा सस्ते (वय ५३, सर्व रा़ साकुर्डे ता. पुरंदर ) अशी त्यांची नावे आहेत़
एक महिन्यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी साकुर्डे येथील शेतकरी अशोक बाजीराव जाधव यांचा तक्रारवाडी साकुर्डे रोड वरील एका शेतात रात्री १० वाजण्याच्या सुमारास खून झाला होता. खून प्रकरणामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण होते. मागील साडेचार वषापूर्वी याच शेतकऱ्याच्या घरावर दरोडा पडला होता, यात त्यांच्या पत्नीचा खून झाला होता. त्या ही प्रकरणाचा छडा न लागल्याने ग्रामस्थांत पोलीसाबद्दल प्रचंड नाराजी होती.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज लोहिया आणि अप्पर पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटना स्थळाला भेट देवून कुटुंबियांशी चर्चा केली होती. त्यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीयार्ने घेवून कोणत्याही परिस्थितीत गुन्ह्याचा तपास लागलाच पाहीजे अशा स्पष्ट सूचना जेजुरी पोलिसांना दिल्या होत्या. जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिस एक महिनाभर कसून तपास करीत होते. पोलिस कर्मचारी रणजीत निगडे, संदीप पवार, घनशाम चव्हाण यांनी वेषांतर करून तब्बल महिनाभर साकुर्डे गावात तळ ठोकला होता. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत देव, पोलिस हवालदार शिवा खोकले, कर्मचारी संतोष अर्जुन, संदीप कारंडे, संतोष कानतोडे, विशाल जावळे, आण्णा देशमुख, संतोष मेढेकर यांचे पथक गुप्त माहीती गोळा करीत होते. अखेर पोलिसांना तपासात यश आले.