सहापैकी चार गटांत चुरशीच्या लढती
By Admin | Updated: February 15, 2017 01:53 IST2017-02-15T01:53:13+5:302017-02-15T01:53:13+5:30
तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सुपे-मेडद, माळेगाव-पणदरे, सांगवी-डोर्लेवाडी आणि वडगाव निंबाळकर- मोरगाव

सहापैकी चार गटांत चुरशीच्या लढती
बारामती : तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सुपे-मेडद, माळेगाव-पणदरे, सांगवी-डोर्लेवाडी आणि वडगाव निंबाळकर- मोरगाव या गटांमधील निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. त्याचबरोबर निंबूत-करंजेपूल या गटामध्येदेखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने बंडखोरी करून उमेदवारी कायम ठेवली आहे. शिर्सुफळ-गुणवडी या गटातील अंतिम उमेदवार बुधवारी स्पष्ट होतील. या गटातून रोहित राजेंद्र पवार निवडणूक लढवित आहे.
सुपे-मेडद गटात मागील निवडणुकीत भाजपाने जोरदार लढत दिली होती. हा गट सर्वसाधारण खुला असल्याने भाजपाने लक्ष केंद्रित केले होते. जिरायती आणि सतत दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटात आजही पाण्याची समस्या आहे. पाण्याचा प्रश्न सोडवू, असेच आश्वासन आतापर्यंत या भागातील जनतेला मिळाले आहे. सतत पाणीटंचाई असलेल्या या भागातील प्रश्न सोडवण्यापेक्षा कार्यकर्त्यांना पदे दिली. मात्र, समस्या कायम राहिल्या. त्यावरच विरोधक प्रचारात मुद्दा करीत आहेत. भाजपा सत्तेत आल्यावर या भागासाठी नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सिंचन योजनेद्वारे उपलब्ध केले. त्याचबरोबर २४ तास वीजपुरवठा करण्यात यश आले, असे भाजपाकडून सांगण्यात येते. बहुरंगी लढतीत भाजपाचे दिलीप खैरे, राष्ट्रवादीचे भरत खैरे, शिवसेनेचे बाळासाहेब बोरकर, काँग्रेसचे संजय चांदगुडे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीकडून प्रचार केला जात आहे. सुपे गणातून भाजपाने विद्यमान सदस्या मंगलताई कौले आणि मेडद गणातून सुवर्णा भापकर यांना रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादीच्या अनुक्रमे नीता बारवकर, शारदा खराडे रिंगणात आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दोन गट येतात. त्यामध्ये माळेगाव -पणदरे, डोर्लेवाडी - सांगवी या गटांचा समावेश आहे. दोन्ही गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने माळेगाव - पणदरे गटात रोहिणी रविराज तावरे यांना उमेदवारी दिली आहे. माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्या पत्नी विजया रंजनकुमार तावरे या रिंगणात आहेत. या गटात शिवसेनेच्या शीतल काटे, काँग्रेसच्या रोहिणी वाबळेदेखील आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील या गटामध्ये पक्षांतर्गत नाराजी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सध्या तरी त्रासदायक ठरत आहे. नात्यागोत्यांना या गटात फार महत्त्व येणार आहे. रंजन तावरे यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्याचबरोबर सांगवी-डोर्लेवाडी या गटात भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या सूनबाई निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मीनाक्षी किरण तावरे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या वर्षा तावरे यादेखील निवडणूक लढवत आहेत. चंद्रराव तावरे, रंजन तावरे या दोघांसाठी दोन्ही गट महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या लढतींकडे लक्ष राहणार आहे. निंबूत - करंजेपूल या गटात धैर्यशील काकडे यांनी राष्ट्रवादीच्याविरोधात बंडखोरी करून उमेदवारी कायम ठेवली. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे इंद्रजित भोसले, काँग्रेसचे तानाजी गायकवाड रिंगणात आहेत. काँग्रेस ४ गटांत, शिवसेना ४ गटांत निवडणूक लढवत आहेत. पंचायत समितीच्या १२ जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढवत आहे. भाजपा ११, शिवसेना ११, काँग्रेस २, राष्ट्रीय समाज पक्ष १ असे उमेदवार रिंगणात आहेत. (वार्ताहर)