सराफी दुकानातून साडेचार लाखांच्या बांगड्या लंपास
By Admin | Updated: March 23, 2017 04:39 IST2017-03-23T04:39:10+5:302017-03-23T04:39:10+5:30
खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी सराफी दुकानामधून साडेचार लाखांच्या हिऱ्याच्या दोन बांगड्या लंपास केल्या.

सराफी दुकानातून साडेचार लाखांच्या बांगड्या लंपास
पुणे : खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी सराफी दुकानामधून साडेचार लाखांच्या हिऱ्याच्या दोन बांगड्या लंपास केल्या. ही घटना सोमवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास लष्कर परिसरातील सेंटर स्ट्रीट रस्त्यावर घडली. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
उत्कर्ष श्रॉफ (वय ३५, रा. लुल्लानगर, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. श्रॉफ यांचे लष्कर भागात ‘उत्कर्ष जेम्स अॅन्ड ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. या दुकानामध्ये दोन भाग करण्यात आलेले आहेत. सोमवारी या ठिकाणी दोन कर्मचारी काम करीत होते.
पहिल्या भागातील कर्मचारी पाणी भरण्यासाठी गेला होता. त्या वेळी दोन जण दुकानाजवळ आले. त्यातील एकजण बाहेर उभा राहिला तर दुसरा तरुण आतमध्ये आला. त्या वेळी दुसऱ्या भागातील कर्मचाऱ्याने त्याला बसण्याची विनंती केली. पाणी आणायला गेलेला कर्मचारी आल्यानंतर तुम्हाला वस्तू दाखवील, असे सांगून तो कामासाठी गेला.
बसलेल्या चोरट्याने कोणाचेही लक्ष नाही तसेच दुकानात कोणीच नसल्याचा फायदा घेत काऊंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या घेतल्या. या बांगड्यांवर हिऱ्याचे बारीक खडे बसवलेले होते. तसेच नक्षीकामही केलेले असून, त्यांची किंमत ४ लाख ५० हजार रुपये आहे. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, तपासाला सुरुवात केली
आहे.
दरम्यान, या चोरट्यांनी अशाच प्रकारे आणखी एका दुकानात चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तपास सहायक निरीक्षक एस. व्ही. गाडे करीत आहेत. (प्रतिनिधी)