मंगळसूत्र हिसकावण्याच्या दिवसभरात चार घटना
By Admin | Updated: October 27, 2015 01:05 IST2015-10-27T01:05:41+5:302015-10-27T01:05:41+5:30
पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित पुणे दौऱ्यावर असतानाच सोनसाखळी चोरट्यांनी डोके वर काढत रविवारी दिवसभरात तीन महिला आणि एका पुरुषाचा ऐवज हिसकावला

मंगळसूत्र हिसकावण्याच्या दिवसभरात चार घटना
पुणे : पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित पुणे दौऱ्यावर असतानाच सोनसाखळी चोरट्यांनी डोके वर काढत रविवारी दिवसभरात तीन महिला आणि एका पुरुषाचा ऐवज हिसकावला. या घटना हडपसर, दापोडी, बोपोडी आणि शुक्रवार पेठेमध्ये घडल्या. या चार घटनांमध्ये मिळून चोरट्यांनी एकूण १ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास केला.
हडपसर पोलीस ठाण्यात ५० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या गेटसमोरून पायी जात होती. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना रविवारी पावणेपाचच्या सुमारास घडली, तर बोपोडीमधील भाऊ पाटील रस्त्यावर रविवारी संध्याकाळी ३९ वर्षीय महिलेच्या गळ्यातील २५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. दापोडीतील गणेश हाईट्स सोसायटी रस्त्यावरून चालत घराकडे जात असताना ४७ वर्षीय महिलेचे ३७ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावल्याची तिसरी घटना घडली.
सांधेदुखीवर औषध देण्याच्या बहाण्याने आलेल्या जाधव नावाच्या व्यक्तीने ज्ञानोबा देशमुख (वय ७९, रा. शुक्रवार पेठ) यांच्या गळ्यातील ४० हजारांची सोनसाखळी काढून घेतली. देशमुख यांच्या घरी आलेल्या या चोरट्याने त्यांना औषध देण्याचा बहाणा करून त्यांच्या नकळत सोनसाखळी काढून घेतली.