चार दिवसांच्या सुट्या, काम आज दुपारपासूनच बंद

By Admin | Updated: December 24, 2015 00:54 IST2015-12-24T00:54:24+5:302015-12-24T00:54:24+5:30

सलग चार दिवसांच्या सुट्या आल्या, पण तरीही महापालिकेच्या बहुसंख्य कार्यालयांतील कामकाज आज (बुधवार) दुपारपासूनच मंदावले होते.

Four-day holidays, work is closed from noon today | चार दिवसांच्या सुट्या, काम आज दुपारपासूनच बंद

चार दिवसांच्या सुट्या, काम आज दुपारपासूनच बंद

पुणे : सलग चार दिवसांच्या सुट्या आल्या, पण तरीही महापालिकेच्या बहुसंख्य कार्यालयांतील कामकाज आज (बुधवार) दुपारपासूनच मंदावले होते. अनेकांनी तर फायली बंद करून कामासाठी आलेल्यांना आता सोमवारीच या, असा सल्ला देण्यास दुपारी ३ नंतरच सुरुवात केली होती. सगळी पालिकाच दुपारी ३ नंतर सुस्तावलेली दिसत होती.
उद्या (गुरुवार) पैगंबर जयंती, शुक्रवारी नाताळ त्यानंतर चौथा शनिवार व रविवारी साप्ताहिक सुटी अशा सलग ४ दिवसांच्या सुट्या महापालिकेला मिळाल्या आहेत. त्यामुळे आज पूर्ण क्षमतेने काम सुरू असेल असाच कोणाचाही समज होईल, प्रत्यक्षातील स्थिती मात्र पूर्ण वेगळी होती. आज दुपारपासूनच अनेक विभागांमधील बहुसंख्य कर्मचारी सुटीच्या मूडमध्ये गेले होते. विविध विभागांची कार्यालये सुरू झाल्यानंतर काही वेळ दैनंदिन काम झाले, नंतर मात्र सगळीकडे सुट्यांचीच चर्चा होती. काही जण तर दुपारी ३ नंतरच टेबलवरच्या फायली बंद करून घड्याळाकडे नजर लावून बसलेले दिसत होते.
पालिकेशी संबंधित कामांसाठी अनेक नागरिक दिवसभर मुख्य इमारतीत येत असतात. त्यातील दुपारनंतर आलेल्या बहुतेकांना आता सोमवारीच या, असा सल्ला ऐकायला मिळाला. साहेब व्हिजिटला गेले आहेत, साहेबांकडे गेले आहेत, त्यांना यायला उशीर होईल, आता येतील असे वाटत नाही, अशीच उत्तरे ऐकायला मिळत होती. पालिकेच्या मुख्य इमारतीच्या कार्यालयांमध्ये असलेली भलीमोठी लॉबी एरवी नेहमीच गजबजलेली असते. आज मात्र गर्दी दिसत नव्हती. कार्यालयांमध्ये डोकावून पाहिले असता रिकाम्या खुर्च्यांचीच संख्या जास्त दिसत होती. साहेबही नाही व कर्मचारीही कामाच्या मूडमध्ये नसल्यासारखे. मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पालिकेचे कॅन्टिन आहे. तिथे चहा व काही मोजकेच खाद्यपदार्थ मिळतात. दुपारनंतर या कॅन्टिनमधील सगळे खाद्यपदार्थ संपले होते व फक्त चहा शिल्लक होता. आज विशेष आॅर्डर नसते, त्यामुळे माल कमीच केला होता, असे कॅन्टिन संचालकाने सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Four-day holidays, work is closed from noon today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.