पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:10 IST2021-05-12T04:10:36+5:302021-05-12T04:10:36+5:30

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. ...

Four arrested for planning to rob a petrol pump | पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक

पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील चौघांना अटक

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने १८ मेपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

गणेश शिवडकर (वय २१), सुनील गायकवाड (वय २३), तिलकसिंग टाक (वय २९), निशांत ऊर्फ ब्लॅक ननावरे (वय २४, सर्व रा. हडपसर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. १० मे रोजी उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली.

महामार्गावरील पेट्रोलपंपावर आरोपी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चोरीच्या कारमधून आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, एक कोयता, एक कटावणी, एक कटर, एक चाकू, एक कात्री, मिरचीपूड इत्यादी साहित्य मिळून आले, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी चार जणांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील इतर आरोपीचा शोध घेण्यासाठी, गुन्ह्यातील हत्यारे त्यांनी कोठून आणली? त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का?, त्यांनी अशा प्रकारे यापूर्वी दरोडा टाकला आहे का? गुन्ह्यातील वापरलेली चोरीची कार त्यांनी कोठून आणली? यासह गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

...

Web Title: Four arrested for planning to rob a petrol pump