शिरगाव : शिवसेनेचे निष्ठावान आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले माजी आमदार प्रकाश केशवराव देवळे (वय ७७) यांचे २३ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ही बातमी मनाला अतिशय वेदना देणारी आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एका राजकीय नेत्यालाच नव्हे, तर एक सामाजिक कार्यकर्ता, शिक्षणतज्ज्ञ आणि एक सच्चा माणूस गमावल्याची भावना अनेकांच्या मनात आहे.
२४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे मूळ गाव पुणे होते. त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले होते शिरगाव गावात त्यांनी २००१ मध्ये प्रतिशिर्डी साई मंदिर उभे करून अनेकांच्या श्रद्धेचे केंद्र निर्माण केले.१९९६ मध्ये विधान परिषदेवर निवडून येत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पराभव केला. ही कामगिरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरली. राजकारणाबरोबरच, त्यांनी अनेक क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. ते शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख, बांधकाम व्यावसायिक, आणि ऑर्केस्ट्राकारही होते. मराठी चित्रपट ‘मायेची सावली’ चे निर्माते, दिग्दर्शक व संगीतकार म्हणूनही त्यांची ओळख होती.
'कलायात्री शिक्षण संस्था' स्थापन करून हजारो भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे त्यांचे कार्य हे त्यांचे सामाजिक भान दर्शवते. अलीकडेच त्यांना नामदेव शिंपी समाजाचा 'समाज भूषण पुरस्कार' मिळाला होता, जो त्यांच्या कार्याची योग्य पावती होती. त्यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे यांच्यासह संपूर्ण समाज एका आधारवडला मुकला आहे. देवळे साहेबांचे व्यक्तिमत्त्व हे साधे, सरळ आणि जनसामान्यांसाठी नेहमी उपलब्ध होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत निकटवर्ती व विश्वासू होते.