माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:40+5:302021-01-08T04:33:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून गळ्याला चाकू ...

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून गळ्याला चाकू लावून राजीनामा देण्यासाठी दबाव टाकून ५ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अॅड. विजय भास्करराव पाटील (वय ५३, रा. दीक्षितवाडी, जळगाव) यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात ९ डिसेंबरला फिर्याद दिली होती. हा प्रकार जानेवारी २०१८ मध्ये कोथरूडमधील हॉटेल किमया येथे घडल्याने जळगाव जिल्ह्यातून हा गुन्हा कोथरूड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तानाजी केशव भोईटे, नीलेश रणजित भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, अलका संतोष पवार, सुषमा इंगळे यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेच्या गैरकारभारामुळे शासनाने त्यावर २०१२ मध्ये प्रशासक नेमला होते. त्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र पाटील, विजय पाटील व इतर १८ जण निवडून आले होते.
तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठीराख्यांचा पराभव झाला होता. जानेवारी २०१८ मध्ये फिर्यादी पाटील यांना नीलेश भोईटे यांचा फोन आला व त्यांनी संस्थेची जुनी कागदपत्रे देण्यासाठी पुण्यात बोलावले. तानाजी भोईटे यांना जळगावला येण्यास मनाई असल्याने पाटील यांना पुण्याला बोलावण्यात आले. हॉटेल किमया येथे तानाजी भोईटे यांनी ‘ही संस्था गिरीशभाऊला हवी आहे़ आमच्या ताब्यात संस्था देऊन टाका. भाऊ एक कोटी देण्यास तयार आहे,’ असे सांगितले. पाटील व महेश पाटील यांनी त्यास नकार दिल्यावर नीलेश भोईटे यांनी गिरीश महाजन यांना व्हॉटसअॅप कॉल लावला. महाजन यांनी ‘तू सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था नीलेशच्या ताब्यात देऊन विषय संपवून टाक’, असे सांगितले. त्याला पाटील यांनी नकार दिला.
त्यानंतर त्यांना संस्थेचे रेकॉर्ड देण्यासाठी सदाशिव पेठेत घेऊन गेले. तेथे त्यांचे हातपाय बांधून मारहाण केली. गळ्याला चाकू लावून त्यांचे कपडे काढून डांबून ठेवले. सर्व संचालकाचे राजीनामे नाही आणले तर ‘एमपीडीए’च्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. राजीनामे देण्यास नकार दिल्याने खंडणी स्वरूपात ५ लाख रुपये घेऊन संस्थेत कुऱ्हाडीसह प्रवेश करुन तोडफोड करून संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या खिशातील ५ हजार रुपये व दोन तोळ्यांची साखळी तोडून घेऊन गेले. आरोपींनी फिर्यादी व इतरांना संस्थेत जाण्यापासून मज्जाव केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.