चित्रपटांना भुलल्या अन् त्या चौघी मुंबईला पळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:18+5:302021-01-13T04:25:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर पाहिलेल्या चित्रपटांमधून निर्माण झालेले आकर्षण आणि शाळा बंद असल्याने घरात बसून ...

Forgetting the movies, the last four fled to Mumbai | चित्रपटांना भुलल्या अन् त्या चौघी मुंबईला पळाल्या

चित्रपटांना भुलल्या अन् त्या चौघी मुंबईला पळाल्या

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर पाहिलेल्या चित्रपटांमधून निर्माण झालेले आकर्षण आणि शाळा बंद असल्याने घरात बसून होणारे वाद या कारणांमुळे एकाच वेळी वारज्यातील ४ अल्पवयीन मुली घरातून पळून गेल्याने खळबळ उडाली होती. वारजे पोलिसांनी घेतलेल्या शोधात या मुली मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे सापडल्या. रविवारी दुपारी चारपासून सुरु झालेला शोध सुमारे ८ तासांच्या शोधानंतर रात्री साडेबारा वाजता संपला. या मुली सुखरुप सापडल्याने सर्वांनीच नि:श्वास सोडला.

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन काळात घरात बसून मोबाईलवर चित्रपट पाहताना मुंबईचे आकर्षण निर्माण झाले. त्यातच घरात बसून राहावे लागत असल्याने मोठ्यांकडून होत असलेला राग-राग यामुळे या मुली व्यथित झाल्या. एकाच इमारतीत राहणाऱ्या १२ ते १४ वर्षांच्या या मुली रविवारी (दि. १०) दुपारी घरातून निघून गेल्या. त्यामुळे वारज्याच्या म्हाडा वसाहतीत एकच खळबळ उडाली.

मुलींच्या पालकांनी वारजे पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी यातील गांभीर्य लक्षात घेऊन मुलींच्या तपासाचे आदेश दिले. मुलींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर त्या स्वारगेट येथे गेल्याचे लक्षात आले. स्वारगेट बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्या मुली मुंबईला जाणाऱ्या ‘एसटी’त बसल्याचे दिसले. त्या पनवेलला उतरुन दुसऱ्या बसने दादरला गेल्या. तेथून त्या टॅक्सी करुन छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल येथे पोहोचल्या.

वारजे पोलिसांना त्यांचे ‘लोकेशन’ मिळताच त्यांनी ही बाब लोहमार्ग पोलिसांना कळविली. पोलिसांनी रेल्वे स्टेशनच्या परिसरात शोध घेतला असताना तेथे या मुली आढळून आल्या. त्यांनी मुलींना पोलीस ठाण्यात आणले. सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेवते, पोलीस उपनिरीक्षक मनोहर भोईणे व त्यांचे सहकारी तातडीने मुंबईला गेले व त्यांनी मुलींना ताब्यात घेऊन पुण्यात आणले.

चौकट

सावज बनण्यापूर्वीच

घरातून निघून जाण्याबाबत विचारले असता या मुलींनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात घरी बसून मोबाईलवर पाहिलेल्या चित्रपटांमुळे मुंबईचे आकर्षण निर्माण झाले. घरात सतत होणाऱ्या वादांचा परिणामही त्यांच्यावर होत होता. त्यामुळे त्यांनी एकत्र मुंबईला जाण्याचे ठरवले. मुंबई गाठण्यासाठी त्यांनी घरातून साधारण ४ हजार रुपये घेतले होते. मुंबईत जाऊन काही कामधंदा करण्याचा त्यांचा विचार होता. पोलिसांनी तातडीने केलेल्या हालचालीमुळे या मुली कोणाचेही सावज न ठरता सुखरुपपणे घरी परतू शकल्या.

Web Title: Forgetting the movies, the last four fled to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.