परदेशातील महिलेला लोकन्यायालयात न्याय
By Admin | Updated: November 14, 2016 03:06 IST2016-11-14T03:06:36+5:302016-11-14T03:06:36+5:30
परदेशातील महिलेला लोकन्यायालयात न्याय

परदेशातील महिलेला लोकन्यायालयात न्याय
पुणे : परदेशात असल्याने प्रत्यक्षपणे न्यायालयात हजर राहणे शक्य नव्हते, त्यामुळे अपघाताबाबत नुकसानभरपाई मिळणे अवघड बनले होते़ शेवटी शनिवारी झालेल्या महालोकन्यायालयात पॉवर आॅफ अॅटर्नीद्वारे या महिलेचा प्रतिनिधी उपस्थित राहिला व त्यांना तब्बल ४० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले़ विशेष न्यायाधीश मंगला धोटे, अॅड. मनीषा ओस्तवाल आणि अॅड. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला.
शिल्पा मोहित गर्ग (वय २९) असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. शिल्पा या तळवडे येथील सिंटेजल लिमिटेड या कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. त्या २८ एप्रिल २०११ रोजी दुचाकीवरून कामाला निघाल्या होत्या. त्या वेळी ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात शिल्पा जखमी झाल्या. या प्रकरणी शिल्पा यांनी अॅड. शशिकांत बागमार आणि अॅड. निनाद बागमार यांच्यामार्फत संबंधित ट्रकमालक आणि रॉयल सुंदरम, जनरल अलियांस इन्श्युरन्स कंपनीविरोधात मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला. या दाव्यात ६० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली
होती.
शिल्पा आता अमेरिकेत वास्तव्यास गेल्या आहेत. त्यांनी पॉवर आॅफ अॅटर्नी दिलेल्या व्यक्तीच्या उपस्थितीत हा दावा महालोकअदालतमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आला. रॉयल सुंदरम कंपनीच्या वतीने अॅड. हृषीकेश गानू यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)