पिंपरी : निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव होय. या उत्सवात स्थानिक नागरिक सहभागी होतात. मात्र, परदेशात गेलेले काही जण देखील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होतात. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले. यात मतदानासाठी कतार या देशातून दाम्पत्य आले. या दात्पत्याने प्रवासासाठी लाखभर रुपये खर्च करून मतदानाचा हक्क बजावला.
सुधाकर भोसले आणि अरुणा भोसले, असे दाम्पत्याचे नाव आहे. सुधाकर हे पिंपरीगावात वास्तव्यास आहेत. आयटी इंजिनियर असेलेले सुधाकर हे कतार या देशात अस्पायत झोन येथे फिफा वर्ल्डकपसाठी काम करतात. त्यांची पत्नी अरुणा गृहिणी आहेत. नोकरीनिमित्त सुधाकर यांना कतार देशात जावे लागले. मात्र, लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी ते दोघेही भारतात आले. त्यासाठी त्यांनी आठ दिवसांपूर्वीच विमान तिकिट घेतले होते. भोसले दाम्पत्य कतार येथील घरून शुक्रवारी (दि. १०) रात्री साडेआठच्या सुमारास निघाले. पिंपरी-चिंचवड शहरात ते शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास पोहचले. पिंपरीगाव येथे त्यांचे घर असून, मुलगी लातूर येथे शिक्षणासाठी वास्तव्यास आहे.
सुधाकर भोसले म्हणाले, ‘‘आचारसंहिता लागू झाल्यापासून मतदानाबाबत उत्सुकता होती. मतदानाच्या आठ दिवस आधीच विमानाचे तिकिट घेतले. कतार येथून विमानाने भारतात येण्यासाठी तीन तास लागतात. त्यासाठी २५ हजार रुपये प्रवास भाडे आहे. आम्हा दोघांना ५० हजार रुपये खर्च झाले. परतीच्या प्रवासातही तेवढाच खर्च होणार आहे.’’
अरुणा भोसले म्हणाल्या, ‘‘मतदान करणे हा अधिकार तसेच कर्तव्य देखील आहे. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि भारताचे नागरिक म्हणून आम्ही मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी परदेशातून आलो. आमच्या मुलीनेही मतदान केले. प्रत्येक मतदाराने प्रत्येक निवडणुकीत मतदान केलेच पाहिजे. तरच लोशाहीचा उत्सव साजरा केल्याचा आनंद आपल्याला मिळू शकेल. आज आम्ही खूप आनंदी आहोत.’’