ट्रामा केअर होण्याआधीच पाठपुरावा श्रेयवाद...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:15 IST2021-09-16T04:15:12+5:302021-09-16T04:15:12+5:30
नसरापूर : भोर तालुक्यातील महामार्ग पट्ट्यात २०१७ पासून ट्रामा केअर सेंटर व्हावे अशी मागणी असून ती मूर्त स्वरुपात आणणे ...

ट्रामा केअर होण्याआधीच पाठपुरावा श्रेयवाद...
नसरापूर : भोर तालुक्यातील महामार्ग पट्ट्यात २०१७ पासून ट्रामा केअर सेंटर व्हावे अशी मागणी असून ती मूर्त स्वरुपात आणणे ही आमदार संग्राम थोपटे यांची संकल्पना आहे.गेले अनेक महिने नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी योग्य जागा उपलब्ध करून रुग्णालय मंजुरीसाठी आमदार थोपटे, जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही प्रयत्न केलेले आहेत मात्र या कामाचे श्रेय जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी घेऊ नये, असे मत जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे आणि पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांनी कापूरव्होळ(ता.भोर) येथे पत्रकारांसमोर व्यक्त केले.
तत्पूर्वी नसरापूर येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले होते की,नसरापूर येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर होत असून याबाबत पाठपुरावा केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी तत्त्वतः मान्यता दिल्याची माहिती दिली होती. त्यामुळे नसरापूर भोलावडे गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे व भोंगवली पंचायत समितीचे सदस्य रोहन बाठे यांनी यासंदर्भात झालेला पत्रव्यवहार व कागदपत्रे पत्रकारांसमोर सादर केली.
नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची जुन्या कोंदट वाड्यात जागा असून ती अपुरी असल्याने नवीन जागेसाठी जिल्हा परिषद सदस्य व आरोग्य समिती सदस्य या नात्याने विठ्ठल आवाळे यांनी आमदार थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य समितीच्या बैठकीत ठराव करुन ९ ऑक्टोबर २०१७ च्या सर्वसाधारण सभेत त्यास मंजुरी घेतली आहे.
पुणे-सातारा महामार्गालगत आरोग्य केंद्रासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची जागा उपलब्ध होण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्याकरिता १४ जुलै २०२० रोजी केदार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्णय झाला होता. त्यामुळे नसरापूर- चेलाडी (ता.भोर) येथे महामार्गालगतची पशुसंवर्धन खात्याच्या ८४ गुंठ्यांपैकी ४० गुंठे म्हणजे एक एकर जागा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला होता. त्यातूनच संबंधित जागा आता जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे हस्तांतरित होत आहे.
या निर्णयामुळे महामार्गावर अपघातग्रस्तांसाठी तातडीने उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण ट्रामा केअर व्हावे यासाठी आमदार थोपटे प्रयत्नशील होते. त्यांनी यासाठी महामार्गावरील दोन ते तीन ठिकाणच्या जागा सुचवल्या होत्या. त्यामध्ये आता नसरापूर( चेलाडी ) येथे जागा उपलब्ध झाल्याने तेथेच अजून जागा उपलब्ध करुन ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे होत असलेल्या कामाचे श्रेय काँग्रेसचे आहे. या बाबतीतले सर्व प्रयत्न जनतेला माहिती आहेत त्यामुळे कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये अशी टीका जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांचे नाव न घेता करण्यात आली आहे.