गुजर-निंबाळकरवाडीत डोंगर पोखरून प्लॉटिंग
By Admin | Updated: August 2, 2014 04:08 IST2014-08-02T04:08:03+5:302014-08-02T04:08:03+5:30
शहराच्या दक्षिण हद्दीतील गुजर-निंबाळकरवाडीचा समावेश पालिका हद्दीत करण्याची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली.

गुजर-निंबाळकरवाडीत डोंगर पोखरून प्लॉटिंग
हणमंत पाटील, पुणे
शहराच्या दक्षिण हद्दीतील गुजर-निंबाळकरवाडीचा समावेश पालिका हद्दीत करण्याची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली. त्यामुळे डोंगर पोखरून प्लॉटिंग करणे आणि त्यावर बांधकामाचे अनधिकृत मजले चढविण्याच्या कामांना वेग आला आहे. मात्र, जिल्हाधिकारी अथवा पालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेचे त्यावर कोणतेही नियंत्रण नाही.
माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शहराच्या हद्दीलगतच्या डोंगर व टेकड्यांची पाहणी केली. त्यावेळी कात्रज डोंगर दरीच्या भागातील गुजरवस्ती व निंबाळकरवाडी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे दिसून आले. पालिकेच्या हद्दीलगत अवघ्या दोन ते पाच किलोमीटरवर ही गावे आहेत. आज ना उद्या महापालिकेच्या हद्दीत समावेश होईल तसेच, मुंबई महामार्गाच्या हद्दीलगतची ही गावे असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी मातीमोल भावाने शेतजमिनी व टेकड्या अगोदरच खरेदी करून ठेवल्या आहेत. निंबाळकरवाडी रस्त्यालगतच्या टेकड्या पोखरून प्लास्टिक, स्टील, सिमेंट व लोखंडाचे कारखाने व छोटे व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे परिसरात रोजगारासाठी अनेक ठिकाणाहून याठिकाणी स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी एक ते दोन गुंठ्यांच्या जागेत एक-एक मजले अनधिकृत बांधकामे करून भाड्याने दिले आहेत.
या दोन्ही गावांचा समावेश होणार असल्याची अधिसूचना दोन महिन्यांपूर्वी काढली तरी अंतिम अध्यादेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डोंगर व टेकड्या पोखरून एक ते दोन गुंठ्यांच्या प्लॉटिंगचा वेग वाढला आहे. तसेच ज्यांची बैठी घरे आहेत, त्यांनी महापालिकेच्या हद्दीत समावेश होण्यापूर्वी तातडीने मजले वाढविण्याची कामे सुरू केली आहेत. गुजर-निंबाळकरवाडीच्या डोंगर उतारावरील नैसर्गिक ओढे व नाल्यातही ठिकठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नाले गायब आहेत. त्यामुळे संततधार पावसाळ्यात नाल्यातील घरांना धोका पोहचण्याची आणि दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. त्यामुळे डोंगर उतारावर खुलेआम अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.