चेहऱ्यावर फुलले हास्य
By Admin | Updated: July 6, 2015 04:27 IST2015-07-06T04:27:41+5:302015-07-06T04:27:41+5:30
पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या आदेशानुसार बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात ‘मुस्कान आॅपरेशन’ सुरू करण्यात आले आहे.

चेहऱ्यावर फुलले हास्य
बारामती : पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या आदेशानुसार बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात ‘मुस्कान आॅपरेशन’ सुरू करण्यात आले आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मुस्कान आॅपरेशन पथकाने ४ बेपत्ता मुलांचा शोध लावून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. या मुलांना गुन्हेगारीपासून रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलांना ताब्यात घेतल्यानंतर आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले होते.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. आॅपरेशन मुस्कान पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले, अमित बनकर, पांडुरंग गोरवे या पथकाने हे यश मिळविले आहे.
गुणवडी परिसरातील ३० फाटा येथील नववीमध्ये शिक्षण घेणारा अल्पवयीन मुलगा गेल्या ५ दिवसांपासून बेपत्ता होता. शाळेत जातो, असे सांगून हा मुलगा निघून गेला होता. त्याचे अपहरण झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला होता. दोन दिवसांनी पुण्याहून त्याने पालकांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या स्वाधीन केले. त्याच्या आई-वडिलांचा शेती आणि दुधाचा व्यवसाय आहे. दुसरा मुलगा माळेगाव बुद्रुक संभाजीनगर येथील आहे. याचे वय १७ वर्षे असून दोन वर्षांपासून तो बेपत्ता होता. शहरातील भुरट्या चोऱ्यांमध्ये त्याचा सहभाग होता. बेपत्ता असलेल्या या मुलाचा पोलिसांना पेट्रोलिंग करताना बारामती शहरात नुकताच शोध लागला. आठवी अनुत्तीर्ण असलेल्या मुलाची गुन्हेगारीच्या दिशेने पावले वळली होती. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन केले. याशिवाय येथील एका निवासी शिक्षण संस्थेतून पळून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मुलगा अनाथ आहे. बारामती शहरात त्याचा वावर होता. (प्रतिनिधी)
----------
> आमराई परिसरातील १९ वर्षीय युवक वडील रागवतात म्हणून कोल्हापूर येथे निघून गेला होता. कोल्हापूर येथील कंपनीत त्याने नोकरी देखील केली. मात्र, राग शांत झाल्यावर हा युवक पुन्हा बारामतीत आला. मात्र, पोलिसांना तो परत आल्याबाबत त्याच्या कुटुंबियांनी माहिती दिली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.
४दरम्यान, २००५ पासून बारामती शहर पोलीस ठाण्यात ४६ ‘मिसिंग’च्या तक्रारी दाखल आहेत. त्यापैकी चौघां जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे, असे पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी सांगितले.